अमिताभ बच्चन यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी रात्री दहा वाजता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. दर रविवारी बिग बींच्या ‘जलसा’ या बंगल्याबाहेर त्यांना भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी व त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी ‘जलसा’बाहेर तोबा गर्दी केली होती. मात्र यावेळी ते चाहत्यांची भेट घेऊ शकले नाही. म्हणून ट्विटरच्या माध्यमातून बिग बींनी चाहत्यांची माफी मागितली.
‘माझ्या तब्येतीत सुधारणा होत आहे. पण चाहते या रविवारीसुद्धा मला भेटायला आले. त्यांना भेटण्यासाठी मी बाहेर येऊ शकलो नाही यासाठी मी त्यांची माफी मागतो,’ असं बिग बींनी ट्विटरवर लिहिलं.
T 3524 – I convalesce .. but they still come for the Sunday meet .. my apologies .. could not come out .. pic.twitter.com/qXx3uonlWL
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 20, 2019
१६ ऑक्टोबरला पहाटे अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नियमित आरोग्य तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं म्हटलं जात होतं.
‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही एपिसोड्सची शूटिंग आधीच करुन ठेवल्याने बिग बी काही दिवस आराम करणार आहेत. तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर ते शूटिंग पुन्हा सुरु करणार आहेत.