अभिनेत्री कंगना रणौत आणि हृतिक रोशनच्या वादात दररोज नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. शनिवारी रात्री हृतिकने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या वादासंदर्भात बरेच खुलासे केले. कंगनासोबत कोणतंच नातं नसल्याचं त्याने या मुलाखतीत स्पष्ट केलं. बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींनी ऋतिकची बाजू घेतली. या यादीत आता अभिनेता फरहान अख्तरचंही नाव जोडलं गेलं आहे. फरहानने या संपूर्ण विषयावर आता फेसबुकवर खुलं पत्र शेअर केलं आहे.

‘आज मी एक खुलं पत्र वाचत होतो, जे एका व्यक्तीने महिलेसाठी लिहिलं होतं. या दोघांनाही मी ओळखतो. हा वाद गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, माझ्या माहितीनुसार त्या व्यक्तीने पहिल्यांदा आपली बाजू मांडली आहे. कोण योग्य आणि कोण अयोग्य आहे हे सांगण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. पण मला यावर प्रतिक्रिया नक्कीच द्यायची आहे. अनेकांप्रमाणे मलासुद्धा हेच वाटतं की, आपल्या समाजात महिलांना कमी लेखलं जातं. बलात्काराच्या काही प्रकरणांमध्ये समाजातील काही व्यक्ती पीडितांनाच दोषी मानतात, हे अत्यंत भयंकर आहे,’ असं त्याने फेसबुकवर लिहिलं.

VIDEO : संयमाचं फळ गोड असतं; आमिरनं घेतला अनुभव

कंगना आणि हृतिकच्या वादाकडे वळत त्याने पुढे लिहिलं की, ‘प्रसारमाध्यमांमध्ये ज्याप्रकारे या वादाला दाखवलं गेलं, ते चिंताजनक आहे. काही मोठ्या पत्रकारांनी सत्यता न तपासताच त्या महिलेची एकतर्फी कहाणी सर्वांसमोर ठेवली. हा त्या दुसऱ्या व्यक्तीसोबत भेदभाव नाही का? काही वेळासाठी सर्व भावना, पक्षपात या गोष्टी बाजूला ठेवून घटनेत जे तथ्य आहे, त्याकडे पाहूया. ७ वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यादरम्यान त्या दोघांमध्ये ई-मेल्सद्वारे बराच संवाद साधला गेला, असं ती महिला म्हणते. मात्र आपण कोणतेच ई-मेल केले नसल्याचे त्या व्यक्तीने स्पष्ट केले. तक्रार दाखल करत त्याने कागदपत्रं, फोन, लॅपटॉप तपासासाठी जमा केले होते. मग त्या महिलेने असं का केलं नाही. फोन, लॅपटॉप तपासासाठी दिल्याने ती खरं बोलतेय, हे तरी सिद्ध होईल. त्या व्यक्तीला महिलेकडून हजारहून अधिक ई-मेल्स पाठवले गेले आहेत आणि हे ई-मेल्स पाठवलं नसल्याचं ती महिला म्हणते. उलट त्या व्यक्तीने स्वत:चा अकाऊंट हॅक करून स्वत:लाच मेल पाठवल्याचा आरोप ती करतेय. जर ते सात वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, तर हे सर्व करण्याची त्याला गरजच काय आहे? माझ्या माहितीप्रमाणे त्या व्यक्तीने महिलेच्या एकाही मेलचे उत्तर दिले नाही.’

‘या गोष्टीवर तुम्हीच जरा विचार करा. जर एका महिलेला असे काही ई-मेल्स पुरुषाकडून आले असते तर तेव्हा तुम्ही काय म्हणाल? त्या पुरुषाने म्हटलं असतं की ते रिलेशनशिपमध्ये होते आणि महिलेने स्वत:चा अकाऊंट हॅक करून स्वत:लाच हे सर्व मेल्स केले, तर तुम्ही विश्वास ठेवला असता का? सात वर्ष ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते, हे सिद्ध करण्यासाठी त्या महिलेजवळ कोणतेच पुरावे नाहीत. तिने शेअर केलेल्या फोटोसुद्धा जाणूनबुजून क्रॉप केला आहे. पॅरिसमध्ये झालेल्या कथित साखरपुड्याचाही फोटो तिच्याजवळ नाही. त्या व्यक्तीच्या पासपोर्टवर साखरपुड्यादरम्यानचा फ्रान्सचा शिक्का नाही. या सर्व घटनांमुळे तुम्हाला प्रश्न पडत नाही का?’

‘नेमकं सत्य काय आहे? आपल्याला सत्यच माहित नाही हेच सत्य आहे. या सर्व गोष्टींमुळे त्या व्यक्तीच्या कुटुंबियांवर, मुलांवर काय परिणाम होत असेल, याचा विचारच केला गेला नाही. हे सर्व टीआरपीसाठी केलं असेल, पण हे खूप भयानक आहे. जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत कोणाच्याही वक्तव्यावरून कोणालाही दोषी समजू नये.’

अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि करण जोहरने फरहानचं समर्थन केलं आहे. दोघांनीही ट्विट करत फरहानला साथ दिली आहे.