आईविषयी सर्वच लिहितात पण वडिलांबद्दल कुणीच काही लिहीत नाही, असे सर्वसामान्यांचे म्हणणे असते. रविवारी संपूर्ण जगात पितृ दिन अर्थात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात येणार आहे. आपले अवघे आयुष्य स्वत:साठी नव्हे तर कुटुंबासाठी खर्ची घालणारा ‘बाप’ माणसाच्या कर्तृत्वाला सलाम ठोकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. प्रसिद्ध अभिनेता सागर कारंडे याने यावेळी त्याचं आणि त्याची मुलगी सई सोबतच हळुवार नातं ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी शेअर केलं.
मी ‘फादर्स डे’ किंवा ‘मदर्स डे’ अशा दिवसांना फार महत्त्व देत नाही. प्रेम, काळजी ही आयुष्यभर करण्याची गोष्ट असताना त्याला एका दिवसात मर्यादीत का ठेवा असा साधा विचार माझ्या मनात नेहमीच येतो. पण सईला प्रत्येक दिवसाची ओळख व्हावी यासाठी आम्ही प्रत्येक दिवस साजरा करतो. स्वातंत्र्य दिनापासून ते बालदिन, मातृदिन आणि पितृदिनही. यावेळीही माझी भावंडं आणि त्यांची मुलं असे सगळे रविवारी एकत्र भेटणार आहोत. एक छोटेखानी गेट टू गेदर होणार. घरात सगळी बच्चे मंडळी एकत्र आल्यावर जो कल्ला होतो तो पाहणं कोणत्याही आई- वडिलांसाठी सुखापेक्षा कमी नसतं.
नुकतीच सई पहिलीत गेली. खरंतर सई आणि मी प्रेमाने बोलण्यापेक्षा भांडतोच जास्त. अर्थात यातंही प्रेमच दडलं आहे. मी शुटिंगवरुन कितीही वाजता आलो, अगदी पहाटे ३ किंवा ४ वाजता आलो तरी मी सईला झोपेतून उठवतो आणि थोडावेळ का होईना माझ्याशी गप्पा मारायला सांगतो. तिच्याशी बोलल्याशिवाय मी संपूर्ण दिवस राहूच शकत नाही. तेव्हा ती फार चिडचिड करते आणि परत झोपते. सकाळी उठल्यानंतर तू मला झोपेतून का उठवलंस असं म्हणत परत आमची मारामारी सुरू होते. हे आम्ही दिवसभरही करू शकतो. मला व्हिडिओ गेम खेळायला फार आवडतात. त्यात तिला वेगळा व्हिडिओ गेम खेळायचा असतो यावरून तर आमची फार भांडणं होतात मग ती रागाने बेडरूममध्ये जाऊन तिला आवडणारा व्हिडिओ गेम खेळत बसते.
सई ८ महिन्यांची असताना तिला बऱ्याचदा फिट यायची. एकदा तर ती जगते की नाही याचीही शाश्वती नव्हती. ती पहिली तीन वर्षे आमच्यासाठी सर्वात कठीण होती. माझ्यातल्या पित्याची हाक परमात्म्याने ऐकली आणि माझी सई पूर्ण बरी झाली. तसे क्षण कोणाच्याही आयुष्यात येऊ नये. जे झालं ते झालं पण त्यानंतर मी सईच्या बाबतीत खूप पझेसिव्ह झालो. तिला कुठे लागत तर नाही ना याची आम्ही सगळेच काळजी घेतो. कित्येकदा नात्यांमध्ये काहीच बोलण्याचीही गरज नसते. कारण तुमच्या कृतीतूनच भावना व्यक्त होत असतात माझं आणि सईचं नातंही बहुधा असंच आहे.
शब्दांकन- मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com