कधी पडलो, धडपडलो, घाबरलो, संकटकाळी किंवा आनंदप्रसंगी प्रत्येकाच्या तोंडात ‘आई’ हाच शब्द येतो. मात्र आई इतकेच महत्व वडिलांचे आहे. त्यांच्याविषयी जास्त बोललं जात नाही, लिहिलं जात नाही. पण कुटुंबाच्या सुखासाठी रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या कणखर बाबांसाठी प्रत्येकाच्याच मनात एक वेगळाच आदर असतो. बाबांप्रती असलेल्या या आदराला व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच ‘फादर्स डे’.

‘सैराट’ चित्रपटातून आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांनाच भारावून टाकणाऱ्या ‘आर्ची’ला आज सगळेच ओळखतात. चित्रपटसृष्टीत पदार्पण करताच राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या रिंकू राजगुरूने अवघ्या काही काळातच चाहत्यांना वेड लावलंय. तिच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायची इच्छा तिच्या चाहत्यांना असेलच. ‘फादर्स डे’निमित्त रिंकूच्या बाबांनी तिच्या काही आठवणी, काही गमतीशीर किस्से सांगितले आहेत.

रिंकू ‘सैराट’ चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच लहानपणापासूनच धाडसी आणि हट्टी असल्याचं तिचे बाबा सांगतात. तिच्या लहानपणीचा एक किस्सा सांगताना तिचे बाबा म्हणतात, ‘उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी घराबाहेर खेळायला जाऊ नकोस असं रिंकूला नेहमीच सांगायचो. अशा वेळी घरात दुपारी सगळे झोपल्यावर ती हळूच खेळायला बाहेर पडायची. अशा वेळी तिला खेळण्यास नकार दिला तर तिचा हट्ट झेलायची हिंमत मात्र घरात कोणामध्येच नव्हती. एखादी गोष्ट मनात ठरवली की ती केल्याशिवाय तिला चैन पडत नाही.’ रिंकूच्या हट्टी स्वभावाबरोबरच तिच्या धाडसीपणाचाही एक गमतीशीर किस्सा तिचे बाबा सांगतात, ‘लहानपणापासूनच रिंकू कोणालाच घाबरत नव्हती. सहावीत असताना शाळा सुटल्यावर ती सायकलवरून घरी परतत होती. त्यावेळी एक दुचाकीस्वार रिंकूच्या सायकलला धडकला. आपल्या पायाला जखम झाल्याकडे लक्षही न देता तिने त्या दुचाकीची चक्क चावी काढून घेतली आणि दुचाकीस्वाराला सायकलची निघालेली चैन लावून देण्यास सांगितले. अत्यंत रागात असलेल्या रिंकूला जेव्हा एका मित्राने समजावले तेव्हा तिने त्या दुचाकीस्वाराला त्याची चावी परत केली.’ रिंकूच्या मूळ स्वभावात ‘आर्ची’ लहानपणापासूनच होती हे आपल्याला या गोष्टींवरून नक्कीच समजेल.

वाचा : आर्चीच्या दहावीच्या निकालाची प्रत सोशल मीडियावर व्हायरल

अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी रिंकू शिक्षणातही मागे राहिली नाही. नुकताच लागलेल्या दहावीच्या निकालात रिंकूने ६६.४० टक्क्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. शूटिंग आणि अभ्यास यांमध्ये समन्वय साधत अभ्यासाला कमी वेळ असतानाही तिने चांगले गुण मिळवले असे तिचे बाबा म्हणतात. शिक्षणातही अपेक्षित प्रगती करणाऱ्या आणि मुलीच्या नावाने आपल्याला ओळखत असल्याचा अभिमान असल्याचं तिचे बाबा गर्वाने सांगतात.

रिंकूच्या बाबांच्या नजरेतून धाडसी, मेहनती आणि ध्येयाला गाठण्यासाठी जिद्द बाळगणारी ‘आर्ची’ आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. अभिनय क्षेत्रात जरी नाव कमावले तरी शिक्षणालाही तितकंच महत्त्व देणाऱ्या आपल्या बाबांसाठी रिंकूने दहावीत चांगले गुण मिळवून ‘फादर्स डे’ची भेटच दिली असं म्हणायला हरकत नाही.

शब्दांकन : स्वाती वेमूल 

swati.vemul@indianexpress.com