‘पद्मावत’वरून वादविवाद सुरूच; अभिनेत्री स्वरा भास्करची खुल्या पत्राद्वारे टीका; कायदेभंग केल्याचा आरोप

पद्मावत या चित्रपटात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी जोहर व सती प्रथेचे अविचाराने उदात्तीकरण केले आहे, अशी टीका प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर हिने एका खुल्या पत्रात केली आहे. ‘द वायर’ या संकेतस्थळावर हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

स्वरा भास्कर हिने भन्साळी यांच्या ‘गुजारिश’ चित्रपटात भूमिका केली होती. तिने म्हटले आहे की, आपल्या देशातील कायद्यालाच आव्हान देण्याचा हा घातक पायंडा पाडण्यात आला आहे. स्वतंत्र भारतात ‘दी इंडियन सती प्रिव्हेन्शन अॅक्ट १९८८’ हा संमत झालेला असताना अशा प्रकारे सती प्रथेचे उदात्तीकरण करणे हा गुन्हा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने अविचाराने वागून हे उदात्तीकरण केले आहे त्याचे उत्तर द्यावे. एक तिकीट काढून चित्रपट पाहणारी प्रेक्षक या नात्याने मी हा प्रश्न विचारत आहे. जेव्हा लाल पोशाख केलेल्या या स्त्रिया जोहरसाठी जाताना दाखवल्या आहेत त्यात प्रेक्षक त्या कृत्याकडेच आकर्षित होऊन त्याची स्तुती करतात. तुमचे चित्रपट हे लोकांना प्रेरक, चेतवणारे असतात त्यामुळे भावनिक चढउतार होऊ शकतात व त्यामुळे लोकांच्या विचारांवर परिणाम होतो. परिणामी तुम्ही जे केले आहे त्याची जबाबदारी तुमच्यावर येते. सती व महिलांवर बलात्कार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

सती व जोहर प्रथा दाखवून एक प्रकारे यातील स्त्रियांची स्वत:लाच दोष देण्याची मानसिकता दिसते. त्याची लागण सर्व देशात आधीच झालेली आहे. रजपूतांचा सन्मान, त्यांच्या स्त्रियांचे जोहरमध्ये त्याग करणे हे सगळे तुम्ही दाखवले आहे त्यातच अल्लाउद्दीन खिलजी हा राक्षस आहे असेच चित्रित केले असल्याचे तिने या पत्रामध्ये म्हटले आहे.

सुरुवातीला समर्थन

भन्साळी यांच्या पद्मावत चित्रपटाचे सुरुवातीला स्वरा भास्कर हिने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समर्थन केले होते.

  • स्वरा भास्कर हिने म्हटले आहे की, महिलांना बलात्कार झाला तरी जगण्याचा अधिकार आहे.
  • त्यांचे पती जिवंत असोत नसोत त्यांचा जगण्याच अधिकार हिरावता येणार नाही.
  • चित्रपटामध्ये महिलांची कामगिरी, मतदानाचा अधिकार, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, समान वेतनाचा अधिकार, विशाखा मार्गदर्शक तत्त्वे याचे महत्त्व कमी लेखले आहे.
  • पद्मावती जोहरसाठी पतीची परवानगी मागताना दाखवले आहे. याचा अर्थ पुरुषांच्या संमतीशिवाय स्त्रियांना जगण्याचा अधिकार नाही, असा त्याचा अर्थ होतो, यातून चुकीचा संदेश गेला आहे.