‘बाहुबली २’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर अभिनेता प्रभासच्या आगामी चित्रपटाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. ‘बाहुबली २’ प्रदर्शित होत असतानाच प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाची घोषणा झाली होती. तेव्हापासून या चित्रपटाच्या प्रत्येक घडामोडीवर सगळ्यांची नजर आहे. चित्रपटाबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरु असून त्यासंबंधीची काही माहिती समोर आली आहे.

प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटात स्वातंत्र्यपूर्वीचा काळही दाखवण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. शूटिंगसाठी हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये भलामोठा सेटही तयार करण्यात आलाय. ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटच्या माहितीनुसार रामोजी फिल्म सिटीमधील प्रशस्त गार्डनमध्ये हा सेट उभारण्यात आला असून गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातील काही महत्त्वाच्या दृष्यांचं शूटिंग केलं जातंय. एका महत्त्वाच्या साहसदृष्यासाठी तब्बल १०० हून अधिक घोडे सेटवर आणल्याचीही माहिती मिळतेय. या साहसदृश्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

https://www.instagram.com/p/BXPu6fWlLXI/

या ठराविक दृष्यामध्ये प्रभास एखाद्या महाराजाप्रमाणे पारंपरिक रॉयल कुर्ता आणि पायजमामध्ये दिसणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यपूर्वीचा काळ दाखवण्यात येणार असल्याने इंग्रजांनाही दाखवण्यात येणार हे साहजिक आहे. खाकी गणवेश किंवा रंगीत शर्टपँट असा इंग्रजांचा पोशाष असेल. दरम्यान प्रभासने नुकताच ‘साहो’मधील त्याच्या लूकचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. या फोटोमध्ये त्याची नवीन हेअरस्टाईल पाहायला मिळतेय.

सुरूवातीला ‘साहो’मध्ये अनुष्का शेट्टीचं नाव जरी पुढे आलं असलं तरी तिला या प्रोजेक्टमधून वगळण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. वाढत्या वजनामुळे तिच्या हातून हा चित्रपट गेला असं म्हटलं जातंय. आता बॉलिवूडची ‘हसीना’ म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रभाससोबत ‘साहो’ चित्रपटात काम करणार हे निश्चित झालंय.