करोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात २१ दिवसांचा ‘लॉकडाउन’ जाहिर करण्यात आला आहे. वाढत्या करोना व्हायरसचा संसर्ग थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी सर्वचजण आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत. डॉक्टर, नर्स तर दिवसरात्र रुग्णालयात करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींसाठी काम करत आहेत. अशातच एका अभिनेत्याने करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना ठेवण्यासाठी माझ्या घराचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यास सांगितले आहे.

हे अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून कमल हासन आहेत. त्यांनी ट्विटरद्वारे स्वत:च्या घराचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये करण्यास सांगितले आहे. मी डॉक्टरांच्या मदतीने माझ्या घराचे करोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यासाठी तयार आहे असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटवर सोशल मीडियावर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. तसेच अनेकांनी कमल हासन हे केवळ पडद्यावरीलच हिरो नसून खऱ्याखुऱ्या आयुष्यातही हिरो आहेत असे म्हटले आहे.

यापूर्वी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशने देखील मदत केली होती. त्याने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी N95 व FFP3 मास्कचा वाटत केला. करोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.