गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत बरेच विषय मोठ्या शिताफीने हाताळले जात आहेत. मैत्रीपासून ते अगदी समलैंगिक संबंधांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांपर्यंत विविध कथानकांना मराठी चित्रपटांतून न्याय देण्यात आला आहे. अशा या यादीत आणखी एका अनोख्या चित्रपटाची भर पडली असून, दिग्दर्शक रवी जाधवने त्याच्या फेसबूक अकाऊंटवरुन या चित्रपटाचे पोस्टर सर्वांच्या भेटीला आणले आहे.
‘न्यूड’ असे नाव असणाऱ्या या चित्रपटाचा पोस्टर पाहता, त्याच्या नावारुनच कथानकाचा अंदाज सहज लावता येत आहे. तुळशी वृंदावनापाशी एक महिला आरतीचे ताट घेऊन उभी असल्याचे या पोस्टरमधून पाहायला मिळत आहे. ‘न्यूड’ हे नावही या पोस्टकरवर तितक्याच कलात्मकतेने साकारण्यात आले आहे. चित्रात रंग भरण्यासाठी उपयोगी पडणारा ब्रश आणि ‘स्त्री’ या दोन गोष्टी या नावात अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा
वाचा : २७ मे १९९४ ला होणार होतं सलमानचं लग्न, पण..
रवीने त्याच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करत त्यासोबत कॅप्शनही दिले आहे. ‘आपले विवस्त्र शरीर आणि आत्मा सर्वांसमोर आणणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील त्या प्रत्येक न्यूड मॉडेलसाठी हा चित्रपट समर्पित आहे’, असे त्याने या पोस्टमध्ये लिहिले. चित्रपटगृहात ‘फास्टर फेणे’ चित्रपटासोबत ‘न्यूड’चा टीझरदेखील पाहाता येणार असल्याचा खुलासा त्याने केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये ‘न्यूड’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणखी एक चौकटीबाहेरील कथानक मोठ्या पडद्यावर पाहाता येणार हे नक्की.