अभिनेता शाहिद कपूरने ‘पद्मावती’वर टीका करणाऱ्यांना ‘आधी चित्रपट पहा, मग बोला…’ असा सल्ला दिला आहे. ‘फिल्मफेअर स्टाईल अॅण्ड ग्लॅमर अवॉर्ड’च्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी एकत्र आले होते. त्यावेळी शाहिदने आपले मत मांडले.

वाचा : मिलिंदपाठोपाठ मकरंदही प्रेयसीसोबत राहतोय लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये?

गेल्या काही दिवसांपासून ‘पद्मावती’ सर्वांच्या चर्चेचा विषय आहे. ‘पद्मावती’ मध्ये इतिहासाची मोडतोड केल्याचा आरोप काही राजपूत संघटना आणि राजकीय नेत्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटावर जवळपास सहा राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर , दीपिका पदुकोण आणि भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. चित्रपटाला होणाऱ्या विरोधाबद्दल शाहिदला त्याचे मत विचारण्यात आले.

त्यावर शाहिद म्हणाला की, चित्रपट न पाहता अनेक लोक आपले मत व्यक्त करत आहेत. हे माझ्यासाठी फार आश्चर्यकारक आहे. आम्ही सुरुवातीपासून सांगत आलोय की, आधी चित्रपट पाहा आणि मग तुमचे मत व्यक्त करा. हा चित्रपटच काल्पनिक कथेवर आधारित आहे. विरोधाबद्दल नाराजी व्यक्त करत असताना शाहिदच्या चेहऱ्यावर राग दिसून येत होता.

वाचा : झहीर आणि सागरिका कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला

याआधी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उदघाटनाला शाहिदने हजेरी लावली होती. उदघाटन समारंभानंतर त्याला दीपिका आणि भन्साळी यांना येत असलेल्या धमक्यांबद्दल त्याचे मत विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, कोणतेही हिंसक कृत्य किंवा वक्तव्य योग्य नसतेच. आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कोणालाच दोषी मानले जाऊ शकत नाही, असे आपल्या संविधानात म्हटले आहे. हीच गोष्ट ‘पद्मावती’ चित्रपटाच्या बाबतीत लागू पडते. चित्रपट योग्य आहे की नाही, याचा निर्णय प्रेक्षक घेतील. चित्रपटात काहीही आक्षेपार्ह असल्याचे मला वाटत नाही. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होईल आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळेल असा मला विश्वास असल्याचे शाहिदने सांगितले होते.