‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोने आजवर अनेकांचं आयुष्य बदललं. ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी हा शो देतो आणि त्यातूनच सर्वसामान्यांचं आयुष्य बदललं. केबीसीचा पहिला विजेता कोण होता हे आज फार क्वचित लोकांना माहित असेल. १९ वर्षांपूर्वी केबीसीमध्ये भाग घेताना हर्षवर्धन नवाथे हे विद्यार्थी होते आणि हा शो जिंकल्यानंतर रातोरात ते स्टार झाले होते. १९ वर्षांनंतर आता हर्षवर्धन काय करतात आणि त्यांच्या आयुष्यात कोणकोणते बदल झाले हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांनाच असेल. ‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय बदल झाले हे सांगितलं.

हर्षवर्धन नवाथे आता काय करतात?
”तेव्हा केबीसी हा नवीन शो होता म्हणून लोकांना त्याबद्दल खूप उत्सुकता होती. आता माझा चेहरा पाहून फारसे लोक ओळखत नाहीत पण नावाने पटकन ओळखतात. सध्या मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये CSR आणि एथिक्स डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. या कंपनीत मी २००५ पासून काम करतोय. केबीसी जिंकलो तेव्हा मी विद्यार्थी होतो. त्यावेळी UPSC परीक्षेसाठी तयारी करत होतो. पण केबीसी जिंकल्यावर ती परीक्षा दिली नाही. मात्र कॉर्पोरेटमध्ये राहूनसुद्धा मला तेच काम करण्याची संधी मिळत आहे. आतासुद्धा मी सामाजिक सेवेसाठीच काम करतोय. केबीसीमध्ये जिंकलेली रक्कम मी माझ्या पुढील अभ्यासासाठी वापरली. परदेशात जाऊन एमबीएचं शिक्षण घेतलं,” असं नवाथे यांनी सांगितलं.

केबीसीचा पहिला विजेता झाल्यावर आयुष्यात कोणकोणते बदल झाले?
केबीसी जिंकणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तेव्हा मला मॉडेलिंगसाठीही खूप ऑफर्स आले होते. टीव्हीमध्ये काम करण्याचीही ऑफर मिळाली होती. जाहिरातींमध्ये काम करण्यासाठीही विचारण्यात आलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये मला मुख्य पाहुणे म्हणून बोलवायचे. त्यावेळी जॉन अब्राहम, क्रिकेटर सलील अंकोला यांच्याशी माझी मैत्री झाली.

केबीसी जिंकल्यानंतर पैसे कसे मिळाले होते आणि जिंकलेल्या रकमेपैकी किती रक्कम कापण्यात आली होती?
केबीसीची शूटिंग आधीच व्हायची. त्यामुळे ज्या दिवशी तो एपिसोड प्रसारित होणार त्या तारखेचा चेक मिळायचा. जो तुम्हाला दाखवला जातो तोच चेक दिला जातो. आता तर रक्कम थेट अकाऊंटमध्ये जमा होते. टॅक्स जितका असेल तेवढी रक्कम कापून बाकीची रक्कम अकाऊंटमध्ये जमा होते. मला मिळालेले पैसे मी सेव्हिंग अकाऊंटमध्ये जमा केले होते.

आता केबीसीच्या टीमशी संपर्क आहे का?
वाहिनी जरी बदलली असली तरी केबीसीचे दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन टीम आतासुद्धा तीच आहे. त्यामुळे कोणताही कार्यक्रम असल्यास ते मला बोलवतात. चार-पाच वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात मला बोलावलं गेलं होतं.

तेव्हाच्या आणि आताच्या केबीसीमध्ये काय फरक जाणवतो?
आता १९ वर्ष झाले आहेत. आधी स्टार वाहिनीवर हा शो यायचा, आता सोनीवर येतो. आता स्पर्धक ज्याप्रकारे निवडले जातात, त्यात बरेच बदल झाले आहेत. सुरूवातीला अगदी सामान्यांना निवडायचे. त्यानंतर ग्रामीण भारतातील लोकांवर लक्ष केंद्रीत केलं गेलं. शाहरुख जेव्हा सूत्रसंचालन करायचे तेव्हा तरुणाईवर जास्त भर दिला गेला होता.