खिलाडी कुमारच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झालाय. या चित्रपटाची निर्माती ट्विंकल खन्नाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा फर्स्ट लूक पोस्ट केलाय. आर बाल्की या चित्रपटाचे दिग्दर्शक करत आहेत. चित्रपटाच्या फर्स्ट लूकसोबतच ट्विंकलने प्रदर्शनाची तारीखही जाहीर केलीये. पुढच्या वर्षी १३ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं ट्विंकलने ट्विटमध्ये म्हटलंय.
या फर्स्ट लूकमध्ये घाटाच्या बाजूला अक्षय सायकलवर दोन्ही हात वर करुन बसलेला पाहायला मिळतोय. यामध्ये आनंदी आणि हसरा असा त्याचा चेहरा पाहायला मिळतोय. अक्षयसोबतच चित्रपटात सोनम कपूरचीही भूमिका असणार आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट पहिल्यांदा सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या अरुणाचलम मुरूगनाथ यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अक्षय या चित्रपटात अरुणाचलम यांची भूमिका साकारणार आहे.
Pad-up and get ready for MrsFunnybones Movies and R. Balki's Padman -April 13,2018 @akshaykumar @radhika_apte @sonamakapoor @kriarj pic.twitter.com/62wkVZ4QYe
— Twinkle Khanna (@mrsfunnybones) August 3, 2017
वाचा : …म्हणून ऐश्वर्याने नव्या नवेलीसोबत रेड कार्पेटवर येणं टाळलं
‘जॉली एल.एल.बी.२’च्या यशानंतर अभिनेता अक्षय कुमार अधिकाधिक वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकांमध्ये दिसतोय. सध्या तो ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या ११ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे ‘मोगल’ नावाने येणाऱ्या चित्रपटात अक्षय संगीताचा बादशाह म्हणून एकेकाळी ओळखल्या गेलेल्या गुलशन कुमार यांची भूमिका साकारणार आहे. ‘मोगल’चा फर्स्ट लुकही प्रकाशित झालाय. ‘मोगल’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असला तरी लागोपाठ दोन चरित्रपटांमधून अक्षय कुमारच्या अभिनयाची कमाल त्याच्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.