‘कौन बनेगा करोडपती’चा नववा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. २००० साली सुरु झालेला हा शो आजही तितकाच लोकप्रिय आहे. या शोमधून स्पर्धकांना ज्ञानाच्या जोरावर पैसे कमावता येत असल्याने अनेकांचं जीवन बदललं. पहिल्या सिझनमध्ये मुंबईचा हर्षवर्धन नवाथे जिंकला होता. त्यावेळी तो २७ वर्षांचा होता आणि आयएएस अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न होतं. या शोनंतर त्याचं पूर्ण आयुष्यच बदललं.

शो जिंकल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले याबद्दल ‘दैनिक भास्कर डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाले की, ‘जिंकलेल्या रक्कमेतून टीडीएस कापला जातो असं मी आजकाल ऐकतो. मी नशीबवान होतो, कारण मला जिंकलेली संपूर्ण रक्कम मिळाली. त्यातून मी माझं शिक्षण, पहिली कार आणि मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. घरात ज्या आवश्यक गोष्टी होत्या त्या खरेदी केल्या.’

केबीसीमुळे त्याचं आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही असंही तो म्हणाला. ‘मला आयएएस अधिकारी व्हायचं होतं. मात्र केबीसीमुळे मी पुढे जाऊ शकलो नाही. ‘स्टार प्लस’ वाहिनीच्या करारामध्ये काही अटी होत्या. पण माझ्या स्वप्नांना मी सोडू शकत नव्हतो. त्यामुळे मी सरकारशी निगडीत काही प्रोजेक्ट्सवर काम करायला सुरुवात केली. काही स्वयंसेवी संस्थांची कामंही मी पाहिली,’ असं पुढे तो म्हणाले.

‘केबीसीमुळे मला पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. माझी एक वेगळी ओळख निर्माण झाली. केबीसीचा पहिला विजेता म्हणून मला सगळे ओळखतात. एक कोटी रुपये जिंकणं हे एखाद्या जादूसारखंच होतं. त्या गोष्टीला १७ वर्ष झाली आहेत, पण आजही आठवणी ताज्या आहेत,’ असंही तो म्हणाला. हा शो जिंकल्यानंतर हर्षवर्धन जणू काही सुपरस्टारच झाला होता. त्याचा ऑटोग्राफ घेणाऱ्यांच्या जमावापासून वाचण्यासाठी त्याला पोलीस संरक्षणही देण्यात आलं होतं. हा काळ माझ्यासाठी एका मोठ्या जल्लोषासारखाच होता असं तो म्हणतो. त्यावेळी त्याने अनेक मोठ्या व्यक्तींची भेट घेतली आणि समाजसेवेतही योगदान दिलं. मात्र हे सर्व एका ठराविक काळापुरतंच मर्यादित होतं. वर्षभरानंतर तो पुन्हा एका सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगू लागला.

वाचा : बार्सिलोना दहशतवादी हल्ल्यादरम्यान ‘ही’ अभिनेत्री रेस्तराँच्या फ्रिजरमध्ये लपली

केबीसीने अनेकांना बरंच काही दिलं. त्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये हा शो लोकप्रिय आहे. पैसे जिंकण्याच्या संधीसोबतच स्पर्धकांना बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधीही मिळते. यंदाच्या सिझनचंही सूत्रसंचालन बिग बीच करणार आहेत. २८ ऑगस्टपासून या शोचा नववा सिझन सुरु होतोय.