२०१७ या वर्षांत मराठी मालिकाविश्वामध्ये नवनवीन मालिका दाखल झाल्या. सासू-सुनांचे टिपिकल वाद बाजूला सारून नवनवीन विषयांना फोडणी द्यायला वाहिन्यांनी  प्राधान्य दिलं. या विषयांमुळे मालिकोंच्या माध्यमातून काही नवीन चेहरे तर काही जुने चेहरे नव्या रूपात छोटय़ा पडद्यावर प्रेक्षकांना बघायला मिळाले. अल्पावधीतच हे चेहरे प्रेक्षकांमध्ये हिट ठरले. अशा मोजक्याच हिट ठरलेल्या कलाकारांना यंदाचं वर्ष कसं गेलं? नवीन वर्षांत ते कोणत्या भूमिकेत दिसणार आहेत याविषयी जाणून घेऊ या त्यांच्यात शब्दांत..

प्रेक्षकांसमोर आलो

Anti-Rape Wears To Avoid Rape Cases:
Anti Rape Underwear काय काम करतात बघा; श्रीमंतीच्या वेडात उत्पादकांनी महिलांच्या ‘या’ प्रश्नांची उडवली खिल्ली
Nagpur, Smartphones, parents,
‘पाल्यांच्या कोवळ्या मनातील सुप्त प्रश्नांची उत्तरे पालकांनीच शोधावी’
iran women hijab
हिजाब न घातल्याने महिलांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, इराणमध्ये नक्की काय घडत आहे?
dhule srpf marathi news,
धुळे: गैरहजर कर्मचाऱ्यांकडून लाच स्वीकारताना पोलीस उपअधीक्षक ताब्यात

महाविद्यालयामध्ये असतानाच मी अभिनयाची सुरुवात केली. प्रचंड मेहनतीच्या बळावर अनुभव घेत गेलो. आणि हे अनुभवाचं गाठोडं ‘फुलपाखरू’च्या ऑडिशनच्या दिवशी वापरलं. ऑडिशन जिंकलो. या मालिकेमुळे मी यंदाच्या वर्षी घराघरांत पोहोचलो. मी स्वत: उत्तम गिटार वाजवू शकतो व गायन करू शकतो. सेटवर फावल्या वेळात आम्ही सर्व जण एकत्र येऊन गायचो. माझं गाणं मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी ऐकलं होतं. त्यांनीच मला मालिकेत एक रोमँटिक सॉंग गाण्याची संधी दिली. आणि माझ्यातल्या गायकालाही प्रेक्षकांसमोर आणून उभं केलं. जसं प्रेक्षकांनी अभिनेता म्हणून स्वीकारलं तसंच गायक म्हणूनही स्वीकारलं. हे वर्ष सुखद धक्क्य़ांनी परिपूर्ण होतं असं मी म्हणेन. पुढच्या वर्षी हेच काम जबाबदारीने पुढे नेतानाच व्यायाम, फिटनेस यावरही लक्ष केंद्रित करणार आहे.

यशोमान आपटे फुलपाखरू’, झी युवा

सैन्याशी लागिरं झालं जी

या वर्षांची माझी सुरुवातच गोड बातमीने झाली होती. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेसाठी माझी निवड झाल्याची बातमी कळताच एकच आनंद कुटुंबात नाचू लागला होता. नृत्य हा खरं म्हणजे माझा छंद आहे. अनवधानाने मी यावर्षी अभिनयाच्या क्षेत्रात आलो, पण माझं अख्खं आयुष्य बदलून गेलं. सैनिकी जीवनावर भाष्य करणारी मालिका असल्यामुळे सैनिकी जीवन जवळून पाहायला व अनुभवायला मिळतं आहे. महाराष्ट्राचा सैनिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन मालिकेमुळे बदलला. मालिकेमुळे यंदाच्या वर्षी अनेक चांगली चांगली मुलं सैन्यात भरती झाली. मालिका-चित्रपटांचा समाजावर परिणाम होतो हे ऐकून होतो मात्र हे सकारात्मक बदल यावर्षी स्वत: अनुभवले. २०१८ हे वर्ष उंबरठय़ावर येऊन उभं आहे. येत्या वर्षी मी फक्त आणि फक्त कामावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला आहे.

नितीश चव्हाण लागिरं झालं जी’, झी मराठी

मन फुलपाखरूझाले

‘दुर्वा’ मालिकेचं चित्रीकरण संपल्यावर पुढे काय करायचं? अशी प्रश्नार्थक सुरुवात या वर्षांची झाली खरी. पण ‘दुर्वा’पेक्षाही अधिक भरभरून प्रेम वैदहीला मिळतं आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे यंदाच्या वर्षी माझी कोणकोणत्या सर्वोत्तम लोकांशी भेट झाली अशी जर यादी मी काढली तर या भल्यामोठय़ा यादीत मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांचं नाव सर्वप्रथम असेल. मंदारदादासारख्या हुशार दिग्दर्शकासोबत काम करता करता खूप काही शिकले. कॉलेजगर्लची व्यक्तिरेखा असल्यामुळे कॉलेजचे दिवस पुन्हा एकदा जगते आहे. यंदाच्या वर्षी मी माझ्या चाहत्यांमध्ये ‘फुलपाखरू’ होऊन बागडतेय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या वर्षांच्या सुरुवातीला मी फिटनेसवर लक्ष देण्याचा संकल्प केला होता. यावर्षी तो पूर्ण झालेला नाही. मात्र पुढच्या वर्षी हाच संकल्प करत तो काटेकोरपणे पाळण्याची प्रतिज्ञाच घेतली आहे.

ऋता दुर्गुळे फुलपाखरू’, झी युवा

मालूच्या निमित्ताने

२०१७ या वर्षांने सर्वागीण आयुष्याला कलाटणी दिली. या वर्षांची सुरुवात ‘झी मराठी’च्या लोकप्रिय ठरलेल्या ‘चुक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकेच्या चित्रीकरणानेच झाली. मी कित्येक र्वष टेलिव्हिजनवर अभिनेत्री होऊ न प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायचं स्वप्न उराशी बाळगून होते. त्या स्वप्नाची पूर्ती यंदाच्या वर्षी झाली. या मालूमुळे समाजात वावरताना ‘ए ती बघ मालू!’ अशी नकळत साद कानावर पडते. मालूमुळे ओळख निर्माण झाली. स्वभावातदेखील बदल घडला. या मालिकेमुळे नवीन लोकांना भेटायला मिळालं. काम करता करता अभिनयाचे धडेदेखील गिरवायला मिळाले. दिलीप प्रभावळकरांशी ओळख झाली, त्यांच्याबरोबर एकत्र काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी ओळख होऊन नात्याचं मैत्रीत रूपांतर होणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योगच होता. अभिनयाची योग्य वाट मला या वर्षांत सापडली. मालिकेला पूर्णविराम मिळाल्यानंतर मी अलोक राजवाडे दिग्दर्शित एका चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. हा चित्रपट पुढच्या वर्षी  प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यंदाच्या वर्षी मी तब्येतीकडे लक्ष देणार आहे व वजन कमी करण्याचा संकल्प सोडणार आहे आणि व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करण्याचं मनाशी ठरवलं आहे.

सायली पाठक चूक भूल द्यावी घ्यावी’, झी मराठी

कलेची कास धरली

२०१६ मध्ये मी एका नामांकित आयटी कंपनीत काम करत होते. अभिनयाचा किडा कॉलेजविश्वात असल्यापासूनच वळवळत होता. आपल्या मुलीला अभिनय करण्याची मनापासून इच्छा आहे तर तिला एक संधी देऊ , असा निर्णय माझ्या घरच्यांनी घेतला. त्यांनी मला जून २०१६ ते मे २०१७ पर्यंतची वेळ दिली. या कालावधीत तू अभिनय क्षेत्रात सरस ठरलीस तर तिथेच तंबू ठोक अन्यथा परत माघारी ये, असा सामंजस्याने ठराव संमत झाल्यानंतर मी अभिनय क्षेत्रात आले. त्यामुळे २०१७ हे वर्ष इच्छापूर्तीचं व मनासारखं यश देणारं गेलं, हे सांगायला हरकत नाही. कामाची आणि वर्षांची सुरुवातच रमेश भाटकरांबरोबर ‘तनिष्क’च्या जाहिरातीने झाली. ऑगस्ट महिन्यापासून हक्काची ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’ ही मालिका मिळाली. अमृताने मला समाजात ओळख दिली. वर्षभरात कामाचा तर अनुभव आलाच पण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला.  मी शास्त्रीय संगीताच्या चार परीक्षा दिल्या आहेत. त्यामुळे मी नव्या वर्षांत पुन्हा रियाजाकडे लक्ष देणार आहे. दिवसभराचा हिशोब ठेवण्याचा संकल्पही सोडायचा आहे.

भाग्यश्री लिमये घाडगे अ‍ॅण्ड सून’,कलर्स मराठी

कौतुक करणारं वर्ष

मी मूळचा पुण्याचा. लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, परंतु अभ्यासात हुशार असल्याने घरच्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिलं. इंजिनीअरिंग पूर्ण करता करता मी मॉडेलिंग देखील करत होतो. १ जानेवारी २०१७ ला मी माझ्या आई-वडिलांना समोर बसवून मला एक वर्ष माझा छंद जोपण्यासाठी द्यावं, अशी गळ घातली होती. ती त्यांनी मान्य केली आणि एप्रिल महिन्यात मी मुंबईत स्थायिक झालो. अभिनयाचा थोडाफार अनुभव होता. त्याच्याच बळावर मी ‘विठु माऊली’ची ऑडिशन दिली आणि जिंकलोदेखील. वर्षांच्या उर्वरित सहा महिन्यांत मी फक्त आणि फक्त कामावर लक्ष दिलं.  माझ्या कामाचं आज सर्वत्र कौतुक होतं आहे. २०१७ या वर्षांने जाता जाता कौतुक तर दिलंच त्याचबरोबर समाजातही एक ओळख मिळवून दिली, स्वत:चं अस्तित्व निर्माण करता आलं. माझे सध्याचे दिवस हे कामाचे आहेत. त्यामुळे नव्या वर्षांत मी केवळ कामावर लक्ष केंद्रित करणार आहे.

अजिंक्य राऊत विठु माऊ ली’, स्टार प्रवाह

धमाकेदार वर्ष

२०१७ या वर्षांची सुरुवातच दणक्यात झाली. समाजात मला ‘राणा दादा’ ही नवी ओळख मिळाली. गेली अनेक र्वष मी अभिनय क्षेत्रात जी मेहनत घेत होतो त्याचं चीज ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे झालं. यंदाच्या वर्षी देवाने मला दिलेली भेट म्हणजे ही मालिका होय. यंदाच्या वर्षी मला कुस्ती शिकायला आणि खेळायलाही मिळाली. शेतकऱ्याचं, पैलवानाचं आयुष्य जवळून बघायला मिळतंय. या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने २०१७ साली कोल्हापूर शहरात अनेक सकारात्मक घटना घडल्या. बंद कुस्तीचे आखाडे पुन्हा सुरू झाले, शेतकऱ्याशी आणि पैलवानांशी मुली लग्न करू लागल्या आहेत. या घटना घडण्यासाठी ‘राणा दा’ आणि ही मालिका निमित्तमात्र ठरली आहे, पण याचा खूप आनंद वाटतो. पुढच्या वर्षी मला सामाजिक स्तरावर गरिबांसाठी, अनाथांसाठी, प्राण्यांसाठी काहीतरी वेगळं काम करायचं आहे.

हार्दिक जोशी तुझ्यात जीव रंगला’, झी मराठी