‘फोर्ब्स’ यादीत आपल्या आवडत्या कलाकाराचं नाव आहे की नाही, हे जाणून घेण्याची साऱ्यांनाच उत्सुकता असते. हॉलिवूड कलाकारांसोबत बॉलिवूड कलाकारांच्या नावांचाही समावेश या यादीत आहे. सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत मार्क वहल्बर्गने बाजी मारली आहे. तर या यादीत बॉलिवूडच्या तीन अभिनेत्यांचीही नावं आहेत. श्रींमत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खान आठव्या स्थानावर आहे. त्याच्या मागोमाग सलमान खान आणि अक्षय कुमार यांनीही आपले नववे आणि १० वे स्थान निश्चित केले आहे.’फोर्ब्स’ने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार एसआरकेने वर्षाला सुमारे २४३.५० कोटी रुपयांची कमाई केली. सलमानने यावर्षी २३७ कोटी रुपयांची तर अक्षय कुमारने २२७.५ कोटींची कमाई केली.

कथा पडद्यामागचीः रंगभूमीची साधना ही एका तपाप्रमाणे- किशोरी शहाणे- विज

त्यांची ही कमाई पाहून ‘फोर्ब्स’ने या तीनही सुपरस्टारची नावं जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत विराजमान केली आहेत. या यादीत यंदा आमिर खानचे नाव मात्र कुठेच दिसले नाही. विशेष म्हणजे ‘दंगल’ सिनेमाने जगभरात एवढी भरघोस कमाई करुनही आमिरचे नाव या यादीत नाही याचेच आश्चर्य त्याच्या चाहत्यांना आहे. ‘दंगल’ सिनेमाने फक्त चीनमध्येच २००० कोटींहून अधिक कमाई केली.

या मासिकाने १ जून २०१६ पासून ते १ जून २०१७ या १२ महिन्यांच्या कालावधीचा अभ्यास केला. तर ‘दंगल’ सिनेमा गेल्यावर्षी २३ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने सर्वाधिक कमाई जानेवारी ते जून या कालावधीत केली. मार्क वहल्बर्ग हा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला. त्याचे वर्षभरातले मानधने हे शाहरुखच्या मानधनापेक्षा ७९ टक्क्यांनी जास्त आहे. ‘ट्रान्सफॉमर्स- द लास्ट नाइट’ या त्याच्या सिनेमाने फारशी कमाई केली नसली तरी त्याच्या ठरलेल्या मानधनाने त्याला सर्वोच्च पदी नेऊन बसवले. त्याची या वर्षाची कमाई ही हॉलिवूडचा सुपरस्टार ड्वेन जॉनसन अर्थात द रॉकपेक्षाही जास्त आहे. गेल्या वर्षी द रॉक हा या यादीत सर्वोच्च स्थानावर होता. यंदा ६.५ कोटी डॉलर्सची कमाई त्याने केली.

ख्रिस हॅम्सवर्थ, सॅम्युअल जॅक्सन आणि टॉम हँक्स हे कलाकार मात्र बॉलिवूडच्या कलाकारांच्याही मागे राहिले. सर्वात व्यग्र अभिनेता अशी ओळख असणाऱ्या मार्क रफेलोला २० व्या स्थानावर समाधान मानावे लागले. ‘ला ला लँड स्टार’ एमा स्टोन यावर्षी जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अग्रस्थानी आहे. यावर्षी तिने २.६ कोटी डॉलर्सची कमाई केली. तर २.५५ कोटी डॉलर्सची कमाई करत जेनिफर अॅनिस्टनने दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीवरुन हॉलिवूडमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनात किती मोठी तफावत आहे हे प्रकर्षाने जाणवते. यंदा या यादीतून दीपिका पदुकोणचेही नाव वगळण्यात आले. गेल्या वर्षी तिने या यादीत टॉप १० मध्ये स्थान पटकावले होते.