‘स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि कधीच हार मानू नका. एक ना एके दिवशी प्रयत्नांना यश मिळतं’, हे आपण अनेकदा ऐकतो. तुम्हाला जर अजूनही या ओळींवर विश्वास नसेल तर अभिनेता बोमन इराणींची स्ट्रगल स्टोरी नक्की वाचा. मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या बोमन इराणीचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करण्यापासून ते ३५ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्यापर्यंतचा बोमनचा प्रवास प्रेरणादायी आहे.

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर त्यांची स्ट्रगल स्टोरी पोस्ट करण्यात आली आहे.

‘माझा जन्म होण्यापूर्वीच वडिलांचं निधन झालं होतं. ते वेफर्सचं दुकान चालवायचे आणि त्यांच्या निधनानंतर आई ते दुकान चालवू लागली. आईला अनेक वर्ष संघर्ष करताना मी पाहिलंय. मी जेव्हा शाळेत जाऊ लागलो होतो, तेव्हा मला बोलण्याचा आणि कोणतीही गोष्टी समजून घेण्याचा, शिकण्याचा त्रास होता. बोलण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मी गायन शिकू लागलो. गायनाच्या एका कार्यक्रमात श्रोत्यांकडून माझ्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. तो आवाज माझ्या आईने रेकॉर्ड केला होता. मी जेव्हा जेव्हा तो आवाज ऐकत असे तेव्हा तेव्हा माझ्यातला आत्मविश्वास अधिक दृढ व्हायचा. मी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलं पण नाटक आणि इतर कलांमध्ये मी नेहमी सहभागी व्हायचो. कॉलेजचं शिक्षण संपल्यावर मला माझ्या कुटुंबीयांची मदत करायची होती. काम करायचं होतं. ताज हॉटेलच्या व्यवस्थापकाची मी भेट घेतली आणि रुफटॉप रेस्टॉरंटमध्ये काम करण्याविषयी त्याला विचारलं. तो म्हणाला, टॉपला पोहोचायचं असेल तर आधी खालपासून सुरुवात करावी लागते. त्यामुळे त्याने मला रुम सर्व्हिसचं काम दिलं. दीड वर्षानंतर मला तिथल्या रेस्टॉरंटमध्ये वेटर म्हणून काम मिळालं.’

https://www.instagram.com/p/Bza9Q_2nkyn/

‘वेटर म्हणून कामाला लागल्यावर माझ्या आईचा अपघात झाला. त्यामुळे मी काम सोडून आईचं दुकान चालवू लागलो. अशीच १४ वर्षे गेली. माझं लग्न झालं, मुलंबाळं झाली पण आयुष्यात कसलीतरी कमतरता सतत जाणवत होती. तेव्हा माझ्या पत्नीने मला प्रोत्साहन दिलं. मला फोटोग्राफीची आवड होती आणि माझे बाबासुद्धा फोटोग्राफी करायचे. मी फोटोग्राफी करत असताना एका मित्राने मला जाहिरातीच्या ऑडीशनसाठी बोलावलं. जाहिरातीसाठी मी निवडलो गेलो आणि काही वर्षांत मी तब्बल १८० हून अधिक जाहिरातींमध्ये काम केलं. काही लोकप्रिय नाटकांमध्येही काम मिळालं. त्यादरम्यान एका लघुपटाची ऑफरसुद्धा मला मिळाली. त्याचा बजेट खूप कमी होता आणि तो हॅँटीकॅमवर शूट होणार होता. पण माझ्यासाठी ती सुवर्णसंधी होती. हा लघुपट विधू विनोद चोप्रा यांनी पाहिला आणि मला भेटण्यासाठी बोलावलं, तेव्हा माझं आयुष्यचं पालटलं. जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला २ लाख रुपयांचा चेक दिला आणि त्यांच्या आगामी चित्रपटात मला संधी दिली. तेव्हा वयाच्या ३५व्या वर्षी मी मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटात काम केलं. माझं स्वप्नवत करिअर सुरू झालं. हे सगळं अनपेक्षित होतं पण मला संधी मिळाली आणि ती मी जाऊ दिली नाही. या प्रवासात अनेक चढउतार आले. पण या चढउतारांमध्येही मी आशा सोडली नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही गोष्टीला कधीच उशीर झालेला नसतो हे मी शिकलो.’

आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन कधीच नसतं हे बोमन इराणीच्या स्ट्रगल स्टोरीतून नक्कीच शिकायला मिळतं.