एफटीआयआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनुपम खेर यांनी गुरूवारी ‘इंडिया टुडे’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुंबई मंथन’ या कार्यक्रमात अनेक विषयांवर आपली मतं मांडली. यावेळी अनुपम खेर यांना स्टार आणि सुपरस्टारमध्ये काय फरक आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अनुपम खेर यांनी सांगितले की, ‘यश आणि अपयशाची नेमकी व्याख्या मांडणे तसे कठीणच आहे. कारण, या व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ्या असतात. माझ्या मते कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टीकोन किंवा त्या गोष्टी हाताळण्याची पद्धतच तुम्हाला यशाच्या पायरीपर्यंत नेऊन सोडतो.’ आयुष्यात आपल्या वाट्याला येणाऱ्या यशाप्रमाणेच अपयशालाही महत्त्वाचे स्थान आहे. यावेळी अनुपम खेर यांनी ‘हम आपके है कौन’, या चित्रपटाच्या वेळचा किस्सा सांगितला.

“त्या चित्रपटाच्या वेळी माझ्या चेहऱ्यावर अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे चेहऱ्याच्या हालचालींवर मर्यादा आली होती. त्यावेळी ‘हम आपके है कौन’ मधील अत्यंत महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण सुरु होते, ज्यामध्ये आम्ही टेरेसवर असतो आणि एक बैठा खेळ खेळत असतो. तेव्हा चित्रीकरण सुरू असताना माझ्या लक्षात आले की, आपला चेहऱ्याच्या एका बाजूच्या स्नायुंनी काम करणे बंद केले आहे. अनिल कपूरची पत्नी सुनिता हिने आणखी एक गोष्ट माझ्या निदर्शनास आणून दिली की, ‘अनुपम तुझ्या एका डोळ्याची भुवईही वर जात नाही’. त्यावेळी मी या गोष्टीकडे लक्ष दिले. दुसऱ्या दिवशी दात घासताना चूळ भरतेवेळी माझ्या लक्षात आले की, माझ्या तोंडातून एका बाजूने पाणी बाहेर येत होते.” परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यानंतर यशजींच्या सांगण्यावरुन अनुपम खेर यांनी डॉक्टरकडे धाव घेतली. डॉक्टरने त्यांना दोन महिने आरम करण्याचा सल्ला दिला. या दोन महिन्यांमध्ये त्यांच्यावर संपूर्ण औषधोपचार, फिजिओथेरेपी करण्यात येणार होती.

(३३ व्या मिनिटापासून पुढे त्यांनी ही आठवण सांगितली आहे.)

याविषयीच पुढे सांगत खेर म्हणाले, ‘त्यावेळी रुग्णालयातून घरी परतताना एक गोष्ट माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली की, जर आजपासून पुढच्या दोन महिन्यांसाठी मी घरातच राहिलो आणि माझा चेहरा कोणालाही दाखवला नाही तर मला उर्वरित आयुष्यही असेच जगावे लागणार. पण, मला माझे आयुष्य त्या पद्धतीने जगायचे नव्हते.’ दोन महिने काम न करण्याचा सल्ला न ऐकत खेर यांनी थेट चित्रपटाच्या सेटवर जात चित्रीकरण सुरु ठेवले. मुख्य म्हणजे तेव्हा सेटवर उपस्थित सलमान खान, माधुरी दीक्षित आणि इतर सर्वांनाच खेर वेडेवाकडे तोंड करुन एखाद्या दृश्यासाठी अभिनय करत आहेत असेच वाटले. पण, त्यावेळी खरी परिस्थिती समोर आल्यानंतर आणि चित्रपटाप्रती खेर यांची समर्पक वृत्ती पाहून सूरज बडजात्या यांनी संपूर्ण दृश्यात बदल करत नव्या संकल्पनेसह ते पुन्हा चित्रीत करण्याचा निर्णय घेतला.

त्या दृश्यामध्ये अनुपम खेर यांच्या चेहऱ्यावर कॅमेरा जास्त जाणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती. पण, आपल्या आयुष्यातील हा प्रसंग ते आजही विसरले नाहीत. हीच एक आठवण सांगत त्यांनी जीवनाकडे पाहण्याच्या त्या दृष्टीकोनामुळेच आपण आज या ठिकाणी तग धरु शकलो असे सांगितले.