बॉलिवूडमध्ये २०१३ मध्ये प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट ‘फुकरे’ खूप गाजला. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अपेक्षित असलेलं सर्व काही या चित्रपटात होतं असं म्हणायला हरकत नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच वेळी याच्या सिक्वलची घोषणा केली होती. एक्सेल एण्टरटेन्मेन्ट बॅनरखाली निर्मिती होणारा ‘फुकरे रिटर्न्स’ आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. पुल्कित सम्राट, वरुण शर्मा, मनज्योत सिंग, अली फजल आणि रिचा चड्डा यांच्या मुख्य भूमिका यात आहेत. दिल्लीमध्ये राहणाऱ्या चार तरुणांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाचं कथानक फिरणार असून, यामध्ये आता जेलमध्ये गेलेल्या ‘भोली पंजाबन’ म्हणजेच रिचा चड्डाची शिक्षा आता संपली आहे. ती या मित्रांच्या टोळीसमोर आता कोणत्या अडचणी उभ्या करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा : ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई

‘फुकरे रिटर्न्स’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता पुल्कित सम्राटचा याआधी प्रदर्शित झालेला ‘जुनूनियत’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करु शकला नव्हता. त्यामुळे या चित्रपटाकडून त्याला नक्कीच अपेक्षा असतील. यशासाठी कोणताही फॉर्म्युला नसतो असे मानणाऱ्या पुल्कितने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र, तुझ्याबद्दल तू ऐकलेली आश्चर्यकारक गोष्ट कोणती, असा सवाल त्याला करण्यात आला त्यावर त्याचे उत्तरही मजेशीर होते. पुल्कित म्हणाला की, माझा पहिला चित्रपट ‘बिटटू बॉस’मध्ये माझ्या वडिलांनी पैसे गुंतवले असल्याची तेव्हा चर्चा होती. या गोष्टीचे माझ्यापेक्षा माझ्या बाबांनाच आश्चर्य वाटले होते. तेव्हा ते मला म्हणाले की, तुझ्या चित्रपटाने तर मला कोट्यधीश केले आणि त्यांना हसू अनावर झाले.

TOP 10 NEWS वाचा : किरण खेर यांच्या वादग्रस्त वक्तव्यापासून भन्साळींच्या ‘पद्मावती’पर्यंत..

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुकरे’च्या या सिक्वलमध्ये ‘चूचा’, ‘लाली’ यांच्यातील धमाल विनोदी संवाद, मित्रांना पेचात पाडणारी मास्टर चूचाही भविष्यवाणी या गोष्टी पुन्हा नव्याने सादर करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ‘उम्मीद पे दुनिया कायम है…’ असं म्हणत आलेल्यांना या चित्रपटातून एक नवा मंत्र देण्यात आला आहे. तो मंत्र म्हणजे, ‘उम्मीद पे नही, जुगाड पे दुनिया कायम है.’ तेव्हा आता मोठ्या आत्मविश्वासाने जुगाड करणाऱ्या या मित्रांचा प्रवास नेमका कसा असणार आहे याचंच उदाहरण या चित्रपटातून आपल्याला पाहता येणार आहे.