मराठी मनोरंजनविश्वात एकाहून एक सरस कार्यक्रम देऊन रसिक प्रेक्षकांची मने जिंकणा-या झी मराठी वाहिनीचा लोकप्रिय पुरस्कार सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड २०१६’ नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. प्रेक्षकांचा कौल घेऊन देण्यात येणा-या या सोहळ्यात यंदा बाजी मारली ती ‘काहे दिया परदेस’ या मालिकेने. सर्वोत्कृष्ट मालिकेसह, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट नायक, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट वडिल, सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट सासू, लक्षवेधी चेहरा असे तब्बल ११ पुरस्कार या मालिकेने पटकावले. सर्व मालिकेतील प्रमुख नायक नायिकेच्या जोड्यांचे बहारदार नृत्य, चला हवा येऊ द्याच्या मंडळींचे हास्यस्फोट आणि वैभव मांगलेच्या सोबतीने मालिकेतील विविध पात्रांचे खुमासदार निवेदन या सर्व गोष्टीने हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला. ‘दिल मराठी धडकन मराठी’ असं ब्रीदवाक्य असलेला आणि मराठीच्या विविध रुपांची गोष्ट आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत सांगणारा हा सोहळा येत्या २३ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.
झी मराठीवरील मालिंकामधून सध्या राज्यातील विविध भागांतील बोलीभाषा बोलणारी पात्रे बघायला मिळत आहेत. मग ‘माझ्या नव-याची बायको’मधील नागपुरची राधिका असो की ‘रात्रीस खेळ चाले’ मधील मालवणी बोलणारी नाईक कुटुंबातील मंडळी. ‘चला हवा येऊ द्या’च्या महाराष्ट्र दौ-यातून विविध गावांमधील लोककलांचे दर्शनही झाले. तर ‘काहे दिया परदेस’मधून भाषेची सीमा पार करत दोन भिन्न संस्कृतींना एकत्र जोडण्याचं कामही झी मराठी करत आहे. हीच संकल्पना घेऊन यावर्षीचा झी मराठी अवॉर्ड सोहळा रंगला. या सोहळ्याचं आकर्षण ठरलं ते यातील कलाकारांचे बहारदार परफॉर्मन्सेस. ‘माझ्या नव-याची बायको’मधील गुरु, शनाया आणि राधिका म्हणजेच अभिजित खांडकेकर, रसिका आणि अनिता दाते यांच्या नृत्याला प्रेक्षकांची भरभरुन दाद मिळाली तर ‘हम आये है यु.पी. बिहार लुटने’ म्हणत शिव आणि गौरीने केलेल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. या सर्वांत वेगळा आणि हटके नृत्याविष्कार बघायला मिळाला तो ‘रात्रीस खेळ चाले’मधील कलाकारांचा. याशिवाय थुकरटवाडीच्या मंडळीने सादर केलेलं होम मिनिस्टरने तर प्रेक्षकांमध्ये हास्यस्फोट घडवून आणले. एकंदरीत नृत्य, हास्य आणि विजेत्यांच्या जल्लोषाने भरलेला हा बहारदार पुरस्कार सोहळा येत्या २३ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
झी मराठी अवॉर्ड २०१६चे विजेते
सर्वोत्कृष्ट मालिका – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट कुटुंब – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट नायिका – गौरी – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट नायक – शिव – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट भावंडं – गौरी-नचिकेत – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – पार्वती आजी – खुलता कळी खुलेना
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – पांडू – रात्रीस खेळ चाले
सर्वोत्कृष्ट जोडी – शिव गौरी – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट आई – राधिका – माझ्या नव-याची बायको
सर्वोत्कृष्ट वडील – मधुसूदन सावंत – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सासू – आजी – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सासरे – मधुसूदन सावंत – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट सून – गौरी – काहे दिया परदेस
सर्वोत्कृष्ट खलनायिका – शनाया – माझ्या नव-याची बायको
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री – महालक्ष्मी – जय मल्हार
सर्वोत्कृ्ष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष – नारद – जय मल्हार
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – खुलता कळी खुलेना
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा – भाऊ कदम – चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सूत्र संचालक – डॉ. निलेश साबळे
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – चला हवा येऊ द्या
विशेष पुरस्कार
वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत लक्षवेधी चेहरा – गौरी – काहे दिया परदेस
कोलगेट मॅक्स फ्रेश फेस ऑफ द इयर – अंजली – तुझ्यात जीव रंगला
‘झी मराठी पुरस्कार २०१६’ विजेत्यांची संपूर्ण यादी
‘झी मराठी अवॉर्ड २०१६’ नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
आणखी वाचा
First published on: 17-10-2016 at 10:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Full list of zee marathi award 2016 winners