बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानच्या बाप्पाचे आगमन यंदा त्याच्या बहिणीच्या घरी होणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच आले होते. यावेळी संपूर्ण ‘खान’दान अर्पिता खान शर्माच्या घरी गणरायाचे स्वागत करेल. गेली १४ वर्षे सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेण्टवर गणेशोत्सव साजरा केला जायचा. खान कुटुंबाने अचानक असा निर्णय का घेतला? यावरून अनेक चर्चांना उधाण आलेले. पण, संपूर्ण कुटुंबाने मिळून हा निर्णय घेतल्याचे समजते. दरवर्षीपेक्षाही अधिक मोठ्या जल्लोषात यंदा अर्पिताच्या घरी गणेशोत्सव साजरा करण्यात येईल.

वाचा : ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पेजवर असा अपलोड करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो

मिळालेल्या माहितीनुसार, यंदा भलेही अर्पिताच्या घरी बाप्पाचे आगमन होत असले तरी सलमान दरवर्षीप्रमाणे त्याच उत्साहाने सहभागी होणार आहे. सलमान त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा हैं’ चे चित्रीकरण अबूधाबी येथे करत होता. तेथून फोनवरूनच तो गणेशोत्सवाची तयारी कशी करावी यासाठी सर्व सूचना तो फोनवरून अर्पिताला देत होता. अर्पिता स्वतः जातीने सर्व सजावटीपासून ते गणरायाच्या आगमनाची तयारी पाहत आहे. दरम्यान, सलमाननेही चित्रीकरणाला ब्रेक देऊन गणरायाच्या आगमनासाठी मुंबई गाठली. गेल्यावर्षी यादरम्यान तो ‘ट्युबलाइट’च्या चित्रीकरणाचे काम करत होता. त्यामुळे त्याला गणेशोत्सवासाठी घरी हजर राहता आले नव्हते. मात्र, यंदा त्याने ती चूक होऊ दिली नाही.

वाचा : या मराठी अभिनेत्याने घरातच साकारली इको फ्रेंडली गणेशमूर्ती

सलमानच्या बहिणीच्या घरी दीड दिवसांच्या बाप्पाची स्थापना केली जाणार आहे. या दीड दिवसांमध्ये सलमानच्या घरी अनेक सेलिब्रिटी बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. खान कुटुंबामध्ये साजऱ्या होणाऱ्या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे दरवर्षी बाप्पाची मूर्ती सारखीच असते. त्यामुळे यंदाही दरवर्षीसारखीच बाप्पाची मूर्ती आणण्यात येईल. मात्र, बाप्पाच्याभोवती केल्या जाणाऱ्या सजावटीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.