बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान गेल्या काही दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्याच्या ९०च्या दशकातील चित्रपटांनी तर धूमाकूळच घातला होता. त्यातील एका चित्रपटात शाहरुखने खलनायकाची भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू केली होती. हा चित्रपट म्हणजे बाजीगर. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बाजीगर चित्रपटात शाहरुखसोबत अभिनेत्री काजोल आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. २६ वर्षांनंतर या चित्रपटासंदर्भात शाहरुखची पत्नी इंटेरिअर डिझायनर गौरी खानने एक खुलासा केला आहे.

त्यावेळी ‘बाजीगर’मधील ‘ये काली काली ऑंखे’ गाणे विशेष गाजले होते. हे गाणे आजही सर्वांच्या लक्षात आहे पण या गाण्यातील शाहरुखचा आउटफिट लक्षात आहे का? गाण्यात शाहरुखने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्यावर लाल रंगाचा शर्ट परिधान केला होता. शाहरुखचा हा आउटफिट खुद्द गौरी खानने डिझाइन केला होता.

नुकताच गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काजोल आणि शाहरुखचा ‘ये काली काली ऑँखे’ गाण्यामधील फोटो शेअर केला आहे. दरम्यान तिने याबाबत माहिती दिली आहे. ‘माझा विश्वास बसत नाही की मी ९०च्या दशकातील शाहरुखचा हा ड्रेस डिझाइन केला आहे. हाताने रंगवलेली ही जीन्स माझी आवडती होती. मेजर थ्रोबॅक’ असे गौरीने फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.

‘बाजीगर’ हा चित्रपट ९०च्या दशकातील सुपरहिट चित्रपट होता. त्यावेळी शाहरुखची खलनायकाच्या भूमिकेची विशेष प्रशंसा झाली होती. या चित्रपटातील ‘हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं’ डायलॉग आजही लोकांमध्ये ऐकायला मिळतो. ‘बाजीगर’ या चित्रपटातून अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तानने केले होते.