पाकिजा आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना वृद्धाश्रमात पाठवण्यात आले आहे.

गीता यांच्या मुलाने त्यांना रुग्णालयात दाखल करून तेथून पळ काढला होता. त्यानंतर सिनेनिर्माते अशोक पंडित आणि रमेश तौरानी यांनी गीता यांचा रुग्णालयातील दीड लाखांचा खर्च केला. आता गीता कपूर यांना अंधेरीतील जीवन आशा वृद्धाश्रमात ठेवण्यात आले आहे.
आपल्या आजारी आईला रुग्णालयात एकटं सोडून जेव्हा त्यांचा मुलगा बिल न भरता तिथून निघून गेला तेव्हा सर्वांना गीता कपूर यांच्या दयनीय अवस्थेची कल्पना आली. गीता यांचा मुलगा त्यांना रुममध्ये कोंडून मारहाण करायचा आणि चार पाच दिवसांमध्ये कधी तरी जेवण द्यायचा. तो स्वतः बॉलिवूडमध्ये कोरिओग्राफर आहे. मुंबईमध्येच गीता यांची मुलगी राहते ती व्यवसायाने हवाई सुंदरी आहे. पण तिनेही आईकडे वृद्धापकाळात पाठ फिरवली.

‘पाकिजा’ फेम गीता कपूर यांचे हाल, रुग्णालयात भरती करुन मुलाने काढला पळ

मीडियामध्ये गीता कपूर यांच्या सद्य स्थितीचे वृत्त आल्यानंतर बॉलिवूडमधून अनेकांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. अशोक पंडीत आणि रमेश तौरानी यांच्यासोबतच रितेश देशमुखनेही त्यांना आर्थिक मदत केली. दरम्यान, कपूर यांच्या दोन्ही मुलांविरोधात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. गीता यांच्या मुलाने तर त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्याची परवानगीही नाकारली होती. पण गीता कपूर यांना वृद्धाश्रमात दाखल करण्याबाबत ना हरकत प्रमाणपत्र दिल्याबद्दल पंडित यांनी ट्विटद्वारे मुंबई पोलिसांचे आभार मानले. अशोक यांनी ट्विट करत म्हटले की, ‘गीता पुन्हा हसत आहेत आणि लवकरच त्या पूर्ण बऱ्याही होतील.’

एवढं सगळं होऊनही गीता यांना त्यांचा मुलगा परत येईल अशी आशा वाटत होती, पण हे खूपच दुःखद आहे असं त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर दीपेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले.