देशात करोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. अशात महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकराने चित्रिकरणावर बंदी आणली होती. यानंतर प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी अनेक मराठी मालिकांचं तसचं रिअ‍ॅलिटी शोचं चित्रीकरण राज्याबाहेर गोवा, दमण, सिल्वासा या ठिकाणी सुरू करण्यात आलं. दरम्यान गोव्यातील फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यात सुरू असलेल्या चित्रिकरणाला विरोध दर्शवला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी करोनाचा धोका लक्षात घेत मालिका आणि सिनेमाच्या शूटिंगवर बंदी घातली आहे. 10 मे पर्यंत गोव्यात मराठी मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे.

विजय सरदेसाई यांनी फातोर्डा आणि मडगाव या परिसरात शूटिंग सुरू असल्यानेच तिथे करोना रग्णांची संख्या वाढल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर विजय सरदेसाई यांनी आंदोलन करत चित्रीकरण थांबवावं ही मागणी लावून धरली. मडगावमधील रवींद्र भवनमध्ये सुरू असलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या सेटवर गोंधळ घालत शूटिंगला विरोध दर्शवला. त्यानंतर गोवा सरकारने निर्णय घेत 10 मे पर्यंत सर्व शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसचं इथून पुढे कोणत्याही नव्या शूटिंगला परवानगी दिली जाणार नसल्याचं जाहीर करण्यात आलंय. रवींद्र भवनमध्ये 150 बेडस् कोव्हिड रुग्णालय उभारण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती. या आंदोलनानंतर आता रवींद्र भवनमध्ये करोना चाचणीसाठी लॅब सुरू करण्याची परवानगी देण्यात आलीय. विजय सरदेसाई यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिलीय.

या मालिकांचं शूटिंग पुन्हा रखडलं!

मुंबईत शूटिंगवर बंदी आणल्यानंतर ‘आई माझी काळू बाई’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ,अग्गंबाई सूनबाई, अशा अनेक मालिकाचं तसंच ‘सूर नवा ध्यास नवा’ या रिअ‍ॅलिटी शोचं शूटिंग गोव्यात सुरु होतं. सर्व प्रकारची काळजी घेत हे चित्रीकरण सुरू होतं. मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे चित्रीकरण बंद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रातत सुरू असलेलं मराठी मालिकांचं शूटिंग बंद करण्यात आल्यानंतर अनेक निर्मात्यांनी गोव्याची वाट धरली. मधल्या काळात जवळपास आठवडाभर काही मालिकांचे पुन्हा जुने भाग दाखवण्यात आले होते. गोव्यात शूटिंग सुरू झाल्याने प्रेक्षकांना त्याच्या आवडत्या अनेक मालिकांचे नवे भाग पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. मात्र आता पुन्हा चित्रिकरणात खंड पडल्याने अनेक निर्मात्यांपुढे पेच निर्माण झालाय.