भारतातील पहिल्या ‘रेकॉर्डिंग सुपरस्टार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौहर जान यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त गुगलने एक सुरेख डूडल साकारत त्यांना आदरांजली वाहिली आहे. २६ जूनला जन्मलेल्या गौहर जान याचं खरं नाव एंजलिना योवर्ड असं होतं. आपल्या गाण्यांचं ध्वनीमुद्रण करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गायिका होत्या. त्यामुळेच त्यांना भारताच्या पहिल्या रेकॉर्डिंग सुपरस्टार असा किताब मिळाला होता.

आयुष्यात त्यांच्या वाट्याला यश आलं खरं. पण, त्याआधी त्यांच्यावर एक आघात झाला होता. ‘एनडीटीव्ही’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार वयाच्या १३ व्या वर्षी गौहर जान यांचं लैंगिक शोषण झालं होतं. त्यानंतर या आघातातून सावरत त्यांनी संगीत क्षेत्रात आपली कामगिरी सुरु ठेवली. गौहर जान यांच्या संघर्षगाथेविषयी ‘माय नेम इज गौहर जान’ या विक्रम संपत लिखित पुस्तकात बरीच माहिती देण्यात आली आहे.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

गायन क्षेत्रात त्यांचं योगदान अतुलनीय आहे. त्यांनी जवळपास २० भाषांमध्ये ठुमरीपासून भजनांपर्यंत प्रत्येक प्रकारची गाणी गायली होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास ६०० गाण्यांचं ध्वनीमुद्रण केलं होतं. दक्षिण आशियातील त्या पहिल्या गायिका ठरल्या ज्यांच्या गाण्यांचं ध्वनीमुद्रण ग्रामोफोन कंपनीकडून करण्यात आलं होतं. १९०२ ते १९२० यादरम्यानच्या कालखंडात द ग्रामोयफोन कंपनी ऑफ इंडियाकडून गौहर यांच्या आवाजातील हिंदुस्तानी, बंगाली, गुजराती, मराठी, तामिळ, अरबी, फारसी, पश्तो, इंग्रजी आणि फ्रेंच गाण्यांच्या डिस्क सर्वांच्या भेटीला आणण्यात आल्या होत्या.