दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं होतं. किंबहुना ‘सैराट’ची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. हीच लोकप्रियता लक्षात घेता निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने त्याचा हिंदी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला. ‘धडक’च्या निमित्ताने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सोमवारी ‘धडक’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि देशभरातल्या सिनेरसिकांनी त्याला डोक्यावर उचलून घेतलं. सोशल मीडियावर आणि गुगलवर गेल्या २४ तासांत देशभरात ‘धडक’चाच बोलबाला पाहायला मिळाला.

काल दिवसभरात ‘धडक’ मोठ्या प्रमाणावर गुगलवर सर्च केला गेला हे गुगल ट्रेण्ड्समधून सहज स्पष्ट होतं. अर्थात ‘धडक’विषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहल असण्यामागचं सर्वांत मोठं कारण ‘सैराट’च आहे. नवोदित कलाकार असूनही आर्ची आणि परश्याने प्रेक्षकांची मनं ज्याप्रकारे जिंकली, त्याचप्रकारे जान्हवी आणि इशान खट्टर यशस्वी ठरतील का असा प्रश्न अनेकांना होता. शिवाय श्रीदेवी यांच्या निधनानंतर जान्हवीचं चित्रपटसृष्टीत पडलेलं पाऊल हे विशेष चर्चेत होतं. त्यामुळे सोशल मीडियावर या ट्रेलरला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला. काहींना ‘सैराट’च्या तुलनेत हा हिंदी रिमेक आवडला नाही तर काहींना रिमेकच्या नावाखाली ‘धडक’चं फक्त हिंदीकरण झाल्याचं वाटलं. अर्थात प्रतिसाद संमिश्र असला तरी कुतूहलपोटी गुगलवर ‘धडक’च सर्वाधिक सर्च केला गेला.

निळ्या रंगाची रेष ‘धडक’विषयी सर्च केल्याचं प्रमाण दाखवते तर लाल रंगाची रेश ‘विश्वरुपम २’बद्दल सर्च केल्याचं प्रमाण दर्शवते.

वाचा : ‘या’ चित्रपटातून महेश बाबू करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?

‘धडक’सोबतच दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांच्या बहुप्रतिक्षित ‘विश्वरुपम २’चा ट्रेलरही सोमवारी प्रदर्शित झाला. २०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विश्वरुपम’चा हा दुसरा भाग असून कमल हसन यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘विश्वरुपम’ बराच वादग्रस्त ठरला होता आणि आता दुसरा भाग चर्चेत येतोय की काय असं अनेकांना वाटलं होतं. पण ‘धडक’च्या तुलनेत ‘विश्वरुपम २’ गुगलवर तितका ट्रेण्ड झाला नाही. त्यामुळे ‘सैराट’चा हिंदी रिमेक कमल हसन यांच्यावर भारी पडला असं म्हणायला हरकत नाही.