बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आणि ‘गरम धरम’ अशी ओळख असलेले धर्मेद्र यांचा आज वाढदिवस. पंजाबमधील लुधियाना येथे ८ डिसेंबर १९३५ रोजी धर्मेंद्र यांचा जन्म झाला. केवल किशन सिंह देओल आणि सतवंत कौर हे त्यांचे आई-वडील. लुधियानामधील लालटन कला गावातील सरकारी शाळेत त्यांचे शिक्षण झाले. याच शाळेत त्यांचे वडील मुख्याध्यापक होते.

१९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी २०११ पर्यंत २४७ चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या. फिल्मफेअर मासिकाचा ‘न्यू टॅलेण्ट’ पुरस्कार जिंकल्यानंतर धर्मेंद्र कामाच्या शोधात पंजाबहून मुंबईला आले होते. त्यानंतर त्यांना अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ चित्रपटात काम मिळाले आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रपटात त्यांनी नेहमीच दमदार भूमिका साकारल्या. ‘अॅक्शन किंग’ आणि ‘ही-मॅन’ या नावांनी प्रसिद्ध असलेल्या धर्मेंद्र यांच्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

वाचा : स्वप्निल जोशी दुसऱ्यांदा झाला बाबा

१. धर्मेंद्र यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यांच्या आईने दिलेल्या एका सल्ल्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य पालटले. फिल्मफेअर मासिकाला फोटो पाठवण्याचा सल्ला धर्मेंद्र यांच्या आईनेच त्यांना दिला होता.

२. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी धर्मेंद्र सव्वाशे रुपये मासिक पगारावर रेल्वेमध्ये क्लर्कची नोकरी करत होते.

३. धर्मेंद्र केवळ १९ वर्षांचे असताना १९५४ मध्ये त्यांचे लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले. यानंतर ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी १९८० मध्ये इस्लाम धर्माचा स्वीकार करून हेमा यांच्याशी लग्न केले.

४. ११९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सनी देओलच्या ‘घायल’ चित्रपटाची निर्मिती धर्मेंद्र यांनीच केली होती. यासाठी त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कारही मिळाला होता.

वाचा : ‘विरुष्का’चं वऱ्हाड निघालं इटलीला?

५. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाकरिता २०१२ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

६. १४व्या लोकसभा निवडणूकीत ते भारतीय जनता पक्षातून जिंकून आले होते. २००५ – २००९ मध्ये ते बीकानेरमधून खासदार म्हणून निवडून आले होते.