सुफी गाण्यांचा बादशहा कैलाश खेर याचा आज वाढदिवस आहे. हटके आवाज आणि अंदाजाने बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणाऱ्या कैलाशचा जन्म उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे झालेला. त्याचे वडील काश्मिरी पंडित होते आणि त्यांना लोकगीतांची बरीच आवड होती. त्यामुळे साहजिकच कैलाशलाही बालपणापासूनच संगीताची आवड होती.

कैलाशने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून गाण गाण्यास सुरुवात केली. त्याच्या या कौशल्यामुळे केवळ त्याचे कुटुंबच नाही तर मित्रपरिवारही मंत्रमुग्ध झाले होते. बालपणीच सर्वांना आपल्या आवाजाने घायाळ करणाऱ्या कैलाशसाठी पुढचा प्रवास सोपा नव्हता. त्याने गाण्याला पूर्णवेळ देण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वप्रथम त्याच्या कुटुंबाचाच त्याला सामना करावा लागला. कारण त्याचा हा निर्णय त्याच्या घरच्यांना मान्य नव्हता. पण, कैलाशने हार न मानता वयाच्या १४व्या वर्षी गाण्यासाठी त्याचे घर सोडले. या दरम्यान तो अनेक ठिकाणी गेला. तेथे जाऊन त्याने लोकसंगीताचे अधिकाधिक ज्ञान संपादित केले. एवढ्या कमी वयात त्याने उचललेले पाऊल खडतर होते. पोटापाण्यासाठी तो लहान मुलांना गाण्याचे क्लास देऊ लागला. प्रत्येक मुलाकडून तो १५० रुपये फी घ्यायचा. यातून तो जेवण, शिक्षण आणि संगीताचा अभ्यास यासाठी लागणारा खर्च काढायचा.

वाचा : सुशांत सिंग राजपूत नासाला जाण्याच्या तयारीत

१९९९ हे वर्ष कैलाशच्या आयुष्यातील सर्वाधिक कठीण होते. त्यावेळी तो नाउमेद झाला होता. आशेचा कोणताच किरण त्याला दिसत नव्हता. त्यावर्षी त्याने मित्रासोबत हॅण्डीक्राफ्ट एक्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला. यात त्याला आणि त्याच्या मित्राला मोठे नुकसान झाले. हे सहन न झाल्यामुळे कैलाशने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. अखेर नैराश्यात गेलेल्या कैलासने ऋषिकेशची वाट धरली.

वाचा : थलायवा रजनीकांत यांचा पहिला सेल्फी व्हिडिओ पाहिलात का?

त्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीत शिक्षण पूर्ण केल्यानतंर कैलास २००१मध्ये मुंबईत आला. त्यावेळी त्याला ज्या काही गाण्याच्या ऑफर्स मिळायच्या त्यासाठी तो लगेच होकार द्यायचा. त्याच्याकडे स्टुडिओला जाण्यासाठीही पैसे नसायचे. कैलाससाठी हे शहर नवीन होते पण त्याच्याकडे असलेल्या संगीत कौशल्याने त्याला जगण्याची आणि इथे राहण्याची उमेद दिली होती. संगीत दिग्दर्शक राम संपतसोबतची भेट त्याच्या आयुष्यात आशेचा नवा किरण घेऊन आली. रामसाठी त्याने जाहिरातीकरिता जिंगल तयार केले. त्याचा आवाज सर्वांना पसंत पडला आणि त्यानंतर त्याच्याकडे जिंगल्सची रांगच लागली. त्याने पॅप्सीपासून ते कोका कोलापर्यंत मोठ्या ब्रॅण्डसाठी जिंगल्स तयार केले. टेलिव्हिजन क्षेत्रात त्याचे नाव मोठे होत असले तरी तेव्हा त्याच्यासाठी बॉलिवूड अजून दूर होते. चित्रपटांमध्ये गाण्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली.

‘अंदाज’ चित्रपटात त्याने ‘रब्बा इश्क न होवे’ गाणे गायले. हे गाणे लोकांच्या पसंतीत पडल्यानंतर त्याने ‘अल्लाह के बंदे’ गाणे गायले. या गाण्याने त्याला इतके लोकप्रिय केले की आजही या गाण्यामुळेच कैलाशला सर्वाधिक ओळखले जाते. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने ‘या रब्बा’, ‘ओ सिकंदर’ यांसारखी अनेक गाणी गायली आहेत. कैलाशने केवळ हिंदीतच नाही तर नेपाळी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, उडिया आणि उर्दू भाषेतही गाणी गायली आहेत. त्याचा ‘कैलासा’ हा बॅण्ड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शो करतो.