अभिनेत्री रम्या कृष्णन आज आपला ४७ व्या वाढदिवस साजरा करतेय. रम्यासाठी हे वर्ष अविस्मरणीय असेच आहे. ‘बाहुबली’ सिनेमानंतर रम्याचे ‘पार्टी’, ‘सबाश नायडू’ आणि ‘थाना सर्था कुतम’ हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. रम्याला ‘बाहुबली’ सिनेमाने रातोरात मेगा स्टार केले. एस एस राजामौली दिग्दर्शित या सिनेमात रम्याने साकारलेली राजमाता शिवगामीदेवी आजही कोणी विसरू शकले नाही. ‘बाहुबली’ सिनेमामुळे जरी रम्याला जगभरात ओळख मिळाली असली तरी हा काही तिचा एकमेव हिट झालेला सिनेमा नाही. रम्याने आपल्या करिअरची सुरूवात बाल-कलाकार म्हणून केली. तिने आतापर्यंत ५ भाषांमध्ये २०० हून अधिक सिनेमांत काम केले. चला तर मग तिच्या अशाच काही हिट सिनेमांची माहिती करुन घेऊ.

बाहुबलीः
तिच्या आतापर्यंतच्या सिनेमांपैकी प्रसिद्धीच्या बाबतीत बाहुबली सिनेमा अग्रणी आहे. जेव्हाही ‘बाहुबली’ सिनेमाचा उल्लेख होईल तेव्हा रम्याचे नाव घेतलेच जाईल, एवढा तगडा परफॉर्मन्स तिने या सिनेमात दिला होता. या सिनेमातल्या तिच्या व्यक्तिरेखेची एवढी चर्चा झाली की चक्क तिच्या या व्यक्तिरेखेवर ‘राइज ऑफ शिवगामी’ हे पुस्तकही लिहिण्यात आले. ही व्यक्तिरेखा रम्या अक्षरशः जगली असेच म्हणावे लागेल. त्यामुळे राजमाता शिवगामी देवीची व्यक्तिरेखा रम्याशिवाय दुसरे कोणीच करु शकणार नाही असेच अनेकांचे मत झाले.

कोन्केम इश्मम कोनकेम काश्मटम
या सिनेमात रम्याने सिद्धार्थच्या आईची गीताची भूमिका साकारली होती. साधीसरळ प्रेमकहाणी असलेल्या या सिनेमात मुलगा आणि पालक यांच्यातले अनोखे नाते दाखवण्यात आले आहे. प्रकाश राज आणि रम्या यांचा घटस्फोट झालेला असतो. तमन्ना भाटिया ही मुख्य अभिनेत्री दाखवण्यात आली आहे. सिद्धार्थच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असल्यामुळे तमन्नाच्या वडिलांना अर्थात नसर यांना आपली मुलगी त्या घरात द्यायची नसते. पण मग सिद्धार्थ आणि तमन्ना कशा पद्धतीने सारे जुळवून आणतात हे पाहण्यासारखे आहे.

पंचथंतिरम
कमल हसन, सिमरन आणि रम्या कृष्णन यांचा हा विनोदीपट तेव्हा फारच गाजला होता. या सिनेमातून रम्या विनोदीपटही उत्तमरित्या करु शकते हे तिने दाखवून दिले होते. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला तर इतर कोणत्याही मालिका आणि सिनेमांपेक्षा तेथील प्रेक्षक हा सिनेमा पाहायला प्राधान्य देतात. बॉलिवूडमध्ये ‘अंदाज अपना अपना’ची जशी क्रेझ दिसते तशी क्रेझ या सिनेमाबद्दलही पाहायला मिळते. खळखळून हसण्यासाठी तुम्हीही एकदा हा सिनेमा पाहाच.

पदायप्पा-
या सिनेमामुळे रम्याचे करिअर अधिक फुलत गेले. या सिनेमात रम्याने नकारात्मक भूमिका वठवली होती. ९० च्या काळात अभिनेत्रीने जर नकारात्मक भूमिका साकारली असेल तर सिनेमाच्या शेवटी तिने केलेल्या कृत्याची माफी मागते. पण या सिनेमात रम्या शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर ठाम राहिलेली दाखवण्यात आली आहे. हा सिनेमा पाहताना रम्या आणि तिने साकारलेली निलांबरी ही भूमिका एकच आहे असे वाटते. रम्याला या भूमिकेसाठी फिल्मफेअरचा सर्वेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

वानैम इलौई
पहिल्या काही सिनेमांपैकी हा एक सिनेमा. केआर बालचंद्र दिग्दर्शित या सिनेमात आनंद बाबु, मधू, राजेश आणि बबलू पृथ्वीराज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. पाच वेगवेगळ्या परिस्थीतीतून आलेल्या या व्यक्ती आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतात. पण मरणापूर्वी ३० दिवस मनमुराद जगण्याचे ते ठरवतात. ते एकत्र कसे येतात, ३० दिवसांचे त्यांचे आयुष्य कसे असते आणि ३० दिवसांनंतर काय होते हे कळून घेण्यासाठी एकदा तरी हा सिनेमा पाहाच.