आमिर खान आणि उर्मिला मातोंडकर यांचा रंगीला हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या लक्षात असेल. या चित्रपटामध्ये उर्मिलाने अत्यंत सुंदररित्या साध्या सरळ मुलीपासून ते आधुनिक मुलीपर्यंतचा प्रवास रेखाटला आहे. याच चित्रपटामुळे ती खऱ्या अर्थाने यशाच्या शिखरावर पोहोचली. उर्मिलाने आतापर्यंत मराठी, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज उर्मिला कलाविश्वात फारशी सक्रिय नसली तरीदेखील तिच्याविषयीच्या चर्चा आजही कलाविश्वामध्ये रंगतात. एकेकाळी याच कलाविश्वामध्ये आणि चाहत्यांमध्ये तिच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.

४ फेब्रुवारी १९७४ मध्ये मुंबईत जन्मलेल्या उर्मिलाने ‘झाकोळ’ (१९८०) या मराठी चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. त्यानंतर तिने १९८१ मध्ये आलेल्या ‘कलयुग’ या हिंदी चित्रपटातही बालकलाकार म्हणून काम केले होते. पण तिला खरी ओळख मिळाली ती ‘मासूम’ या चित्रपटातून.१९९१ मध्ये आलेली ‘नरसिंह’ हा उर्मिलाचा पहिला मुख्य अभिनेत्री असलेला चित्रपट. या चित्रपटापासून तिला ओळख मिळत गेली आणि तिच्या कामावर दिग्दर्शक लक्ष ठेवू लागले.

उर्मिला, राम गोपाल वर्मा यांच्या ‘रंगीला’ या चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार झाली होती. या चित्रपटात तिने एक नावाजलेली अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपटातला उर्मिलाचा बोल्ड अंदाज सगळ्यांनाच आवडला होता. याशिवाय ‘जुदाई’ या चित्रपटातही उर्मिलाने, श्रीदेवीसारख्या अभिनेत्रीला टक्कर दिली होती. तर दुसरीकडे राम गोपाल वर्माच्या ‘सत्या’ या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची वाहवा मिळवली होती. तर ‘चायना गेट’ या चित्रपटातले ‘छम्मा- छम्मा’ हे आयटम साँग आजही अनेकांच्या लक्षात आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना उर्मिला प्रचंड आवडत असल्याची त्याकाळी चर्चा होती. केवळ चर्चाच नाही तर वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याविषयी अनेक रकानेही भरुन यायचे. परंतु त्यांचं नात कधी पुर्णत्वास गेलं नाही. या दोघांनी लग्न केलं नाही त्यामुळे त्या दोघांचेही रस्ते वेगळे झाले. ३ मार्च २०१६ मध्ये उर्मिलाने, तिच्याहून ९ वर्ष लहान मोहसिन अख्तर मीर या व्यावसायिकासोबत लग्न केले. २००७ मध्ये मोहसिन मिस्टर इंडिया या स्पर्धेत दुसरा उपविजेता ठरला होता. त्याने झोया अख्तरच्या लक बाय चान्स या सिनेमातही काम केले आहे.

वाचा : कृष्णा अभिषेकला सोडायचाय ‘द कपिल शर्मा’ शो; कारण…

‘भूत’ या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअरचा समिक्षक पुरस्कार मिळाला होता. तसेच अमृता प्रीतम यांच्या ‘पिंजर’ या कादंबरीवर आधारित चित्रपटातील तिच्या गंभीर भूमिकेतून तिने तिची अभिनय क्षमता दाखवून दिली होती. तर दुसरीकडे ‘प्यार तुने क्या किया’ या चित्रपटात प्रेमासाठी कोणत्याही थरापर्यंत जायला तयार असलेल्या मुलीची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. ‘मैंने गांधी को नहीं मारा’ या चित्रपटातल्या तिच्या अभिनयाची समीक्षकांनी प्रशंसा केली होती.

उर्मिलाने ‘दीवानगी’ या चित्रपटात प्रेमाच्या भावनांचे फार सुरेखरित्या चित्रिकरण केले होते. ‘तहजीब’, ‘एक हसीना थी’, ‘कुंवारा’, ‘जंगल’, ‘बनारस’, ‘अ मिस्टिक लव स्टोरी’ यांसारख्या चित्रपटातही तिने काम केले आहे. हे चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर फार यशस्वी ठरले नसले तरी उर्मिलाच्या अभिनयाला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे. उर्मिलाने छोट्या पडद्यावर कथा सागर, इंद्रधनुष, चक धूम-धूम डान्स महाराष्ट्र डान्स या टीव्ही शोमध्ये काम केले होते.

 

Story img Loader