‘फ्रेंडशिप डे’ म्हणजे काय असतं रे भाऊ, असा प्रश्न फार क्वचितच विचारला जातो. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीची पालवी एकदातरी फुटतेच. कित्येकांच्या आयुष्यात ही पालवी बऱ्याचदा फुटते. मैत्रीला कोणत्याही सीमा किंवा परिभाषा नाही ही बाब आता अनेकांनीच स्वीकारली आहे. अशा या अनोख्या नात्याचा उत्साह ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी साजरा केला जातो. विविध प्रकारचे मेसेजेस, भेटवस्तू किंवा मग नुसतीच फिरस्ती करत हा दिवस साजरा करण्यात येतो. या सर्व उत्साहामध्ये चित्रपट गीतांची महत्त्वाची भूमिका असते.
आजवर बॉलिवूड चित्रपटांतून अनेकदा मैत्रीचं हे नातं आणखीन उठावदारपणे प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे पिकनिकला जाताना किंवा मग मित्र- मंडळींचा अतरंगीपणा आठवताना ही गाणी गुणगुणली जातात, चला तर मग ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने नजर टाकूया या खास गाण्यांवर…
मेरी दोस्ती मेरा प्यार
‘दोस्ती’… हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा चित्रपट. मोहम्मद रफींच्या काही अजरामर गाण्यांमध्ये ‘मेरी दोस्ती मेरा प्यार…’ हे गाणं. मैत्रीच्या नात्याला या गाण्यातून इतक्या सहज आणि सुरेखपणे मांडण्यात आलं आहे की, आजही हे गाणं अनेकांची मनं जिंकतं.
यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी
‘गर खुदा मुझसे कहे कुछ मांग ए बंदे मेरे…’ अशी सुरुवात असणारं मन्ना डे यांच्या आवाजातील ‘यारी है इमान मेरा’ हे गाणं सर्वांच्या आवडीचं. प्राण, अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत हे गाणं ‘जंजीर’ चित्रपटाच्या लोकप्रियतेमागचं एक महत्त्वाचं कारण.
तेरे जैसा यार कहाँ
‘याराना’ चित्रपटातील हे गाणं वाजू लागल्यावर आपोआपच आजूबाजूचे लोकही ते गुणगुणू लागतात. किशोर कुमार यांच्या आवाजातील या गाण्याला राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलं होतं. ‘याराना’ चित्रपटातील या गाण्याशिवाय ‘फ्रेंडशिप डे’ची प्लेलिस्ट पूर्णच होत नाही.
ये दोस्ती
मैत्रीच्या नात्यात आणाभाका घ्यायच्या झाल्या किंवा मग नुसतीच उदाहरणं द्यायची झाली तर ‘जय- वीरु’ यांचं नाव पुढे असतं. ‘शोले’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही मित्रांची जोडी आणि त्यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं ‘ये दोस्ती’ गाणं याबद्दल काय आणि किती सांगावं हाच मोठा प्रश्न.
जाने क्यूं
‘दोस्ताना’ या चित्रपटातील हे गाणं रेडिओवर वाजू लागलं की अनेकजण त्यावर टिचकीचा ठेका देतात. विशाल दादलानीने गायलेलं हे गाणं अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहे. जग इकडचं तिकडे झालं तरीही आपल्या मैत्रीच्या नात्यावर याचा काहीच परिणाम होणार नाही हे अतिशय सुरेखपणे या गाण्यातून मांडण्यात आलं आहे.
यारो दोस्ती बडी हसीं है
के केच्या सुरेख आवाजातील ‘यारो दोस्ती बडी हसी है…’ हे गाणं अनेकांचं ऑल टाइम फेव्हरेट आहे. आयुष्यातील प्रत्येक वळणावर येणारा तो मित्र किंवा ती मैत्रीण आपल्यासाठी किती महत्त्वाचे असतात हे या गाण्यातून सांगण्यात आलं आहे.
जाने नही देंगे तुझे
‘३ इडियट्स’ या चित्रपटातील ‘जाने नही देंगे तुझे’ हे गाणं ऐकताना अनेकांच्या पापण्या ओलावतात. कोमात गेलेल्या आपल्या मित्राला पुन्हा चालतं बोलतं करण्यासाठी आर्ततेने हाक मारणाऱ्या कोणा एकाला नजरेत ठेवत हे गाणं रुपेरी पडद्यावर मांडण्यात आलं आहे. आमिर खान, शर्मन जोशी आणि आर. माधवन यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून सोनू निगमच्या आवाजात ते प्रेक्षकांच्या भेटीला येतं.
नंगा पुंगा
‘उस दोस्त के लिये जिसने एक बूंद भी नही पी और जिसका नाम पीके है…’ असं म्हणत सुरु होणारं हे गाणं अनुष्का आणि आमिरच्या एका वेगळ्याच केमिस्ट्रीमुळे लक्ष वेधतं. वेगळ्याच दुनियेतून आलेल्या दोस्ताची ओळख या गाण्यातून होत आहे.
दिल चाहता है
मैत्री, अतरंगीपणा आणि दुरावलेले मित्र यावर भाष्य करणारा दिल चाहता है हा चित्रपच अनेकांच्याच आवडीचा आहे. याच चित्रपटातील ‘दिल चाहता है…’ हे गाणं ऐन तरुणाईतील मित्रांच्या मनातील खेळ सर्वांसमोर आणतं.