प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी ‘हॅपी फिर भाग जाएगी’ हा चित्रपट सज्ज झाला आहे. सोनाक्षी सिन्हा, जिमी शेरगिल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. जवळपास अडीच मिनिटांचा हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होईल हे नक्की.

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हॅपी भाग जाएगी’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. पहिल्या भागात डायना पेंटी, जिमी शेरगिल, अली फजल, अभय देओल आणि पियुष मिश्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. हेच सर्वजण सिक्वलमध्येही झळकणार आहेत. त्यासोबतच सोनाक्षी सिन्हा आणि पंजाबी गायक- अभिनेता जेसी गिलसुद्धा दिसतील.

वाचा : हातात चित्रपट नसतानाही पैसा येतो कुठून; चाहत्याच्या खोचक प्रश्नाला अभिषेकचं समंजस उत्तर

काही चिनी गुंड सोनाक्षीला हॅपी समजून तिचं अपहरण करतात आणि इथूनच ट्रेलरला सुरुवात होते. तर जिमी शेरगिलचं पुन्हा एकदा लग्न मोडल्याचं दाखवलंय. ट्रेलरमध्ये डायना आणि अली यांना फारसं पाहायला मिळत नाही. पण जिमी शेरगिल या सर्वांत भाव खाऊन जातो.
‘हॅपी भाग जाएगी’ चित्रपटात हॅपी (डायना) आपल्या प्रियकरासोबत (अली फजल) पळून जाते आणि अपघाताने पाकिस्तानला पोहोचते. आता सिक्वलमध्ये काय धमाल पाहायला मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. २४ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.