‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्या दोघांवर कारवाई करण्यात आली होती. या मुद्द्यामुळे या दोघांची प्रचंड बदनामी झाली होती. हे प्रकरण तापले असतानाच दोघांनी माफी मागितली होती, पण आता अखेर हार्दिकने त्या प्रकरणावर मौन सोडले आहे.

काय म्हणाला हार्दिक?

हार्दिक पांड्या[/caption]

“आम्ही क्रिकेटपटू आहोत. त्यामुळे असा प्रकार नॅशनल टेलिव्हिजनवर घडला की त्याचे परिणाम काय होतो, याची आम्हाला कल्पना नसते. मी तेव्हा जे बोलून गेलो, त्यानंतर माझ्या हातात काहीच उरले नव्हते. शब्द तोंडातून सुटले होते. मला ते शब्द मागे घेता आले नसते. त्यामुळे मी पूर्णपणे हतबल होते. टेनिस खेळाचे उदाहरण द्यायचे तर चेंडू माझ्या कोर्टमध्ये नव्हता, तो इतर कोणाच्या तरी कोर्टमध्ये होता. त्यामुळे त्या प्रकरणावर निर्णय घेण्याचा अधिकार मला नव्हता आणि अशा वेळीच आपण अधिक कात्रीत पकडले जातो”, अशा शब्दात हार्दिकने त्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

काय होतं प्रकरण?

‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना करण जोहरने एक प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना या दोघांनी महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे या दोघांवर प्रचंड टीका झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. पण नंतर काही दिवसांनी या दोघांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. पण या दोघांपुढील अडचणी संपलेल्या नव्हत्या, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी या दोघांना नोटीस बजावली होती.

या प्रकरणात BCCI ने पांड्या आणि राहुल यांची बाजू ऐकलेली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी २० मालिका आणि न्यूझीलंड दौरा होण्याआधी हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांच्यावरील बंदी उठवण्यात आली होती. BCCI वर लोकपाल (ओमडसमन) नेमण्यात आला नव्हता, त्यामुळे त्यांच्यावरील बंदी तात्पुरती मागे घेण्यात आली होती. पण लोकपालांची नेमणूक करण्यात आल्यानंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांना साक्ष देण्यासाठी मागील नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर या दोघांना १० लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले.