‘हेट स्टोरी’ चित्रपटातून हिंदी चित्रपचसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री पाउली दाम विवाहबंधनात अडकली आहे. अर्जुन देव याच्यासोबत बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तिने या नव्या नात्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता येथे पाउलीचा विवाहसोहळा पार पडला असून, आता जंगी रिसेप्शनचेही आयोजन करण्यात आले आहे.
या आठवड्याच्या शेवटी पाउलीच्या पतीच्या मूळ गावी म्हणजेच गुवाहाटी येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हेट स्टोरी’ या चित्रपटातून झळकलेली पाउली त्यानंतर फारशी प्रकाशझोतात आली नसली तरी आता मात्र ती सोशल मीडियावर अचानक चर्चेत आली आहे. या चर्चा रंगण्यामागचे मुख्य कारण म्हणजे पाउलीचे लग्न. पारंपरिक बंगाली पद्धतीने पार पडलेल्या विवाहसोहळ्याच्या वेळी पाउलीने गडद लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती. त्यासोबतच चेहऱ्यावर असणाऱ्या आनंदामुळे तिचे रुप आणखीनच खुलून आले होते. अर्जुनही पारंपरिक बंगाली वराच्या वेशात सुरेख दिसत होता. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. सध्या सोशल मीडियावर अनेकांकडून पाउली आणि अंकुरच्या लग्नाचे फोटो पोस्ट करण्यात येत आहेत.
वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?
https://www.instagram.com/p/BcWKFtYH19D/
अभिनय क्षेत्रात अजूनही ती स्वत:ची ओळख प्रस्थापित करु पाहात आहे. याविषयीचे पाउलीचे नेमके काय मत आहे ते ‘इंडिया टुडे’ने प्रसिद्ध केले आहे. ‘अभिनय क्षेत्रात आल्यामुळे माझे स्वप्न साकार झाले आहे, असे मी म्हणून शकत नाही. कारण हे माझे स्वप्न नव्हतेच. कला आणि जिज्ञासू वृत्तीच्या कुटुंबातून मी आली आहे. त्यामुळे हे विश्व माझ्यासाठी फारच नवे होते’, असे तिने स्पष्ट केले होते. ‘हेट स्टोरी’मधील भूमिकेनंतर पाउली त्या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये दिसली नाही. पण, यामागेही एक मुख्य कारण असल्याचे तिने स्पष्ट केले. त्याच चित्रपटातील भूमिकेमुळे तिला फक्त बोल्ड भूमिकांसाठीच ओळखले जाऊ लागले, त्यामुळे या चौकटीतून बाहेर पडण्याच्या विचाराने तिने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.