बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी तो विविध मार्गांचा अवलंब करत असून, काही दिवसांसाठी त्याने चक्क रेडिओ जॉकीचेही काम केले. एका लोकप्रिय रेडिओ चॅनलवर रेडिओ शोची पूर्ण जबाबदारी अक्षयने लिलया पेलली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतानाच त्याने ‘पॅडमॅन’ या आगामी चित्रपटाची प्रसिद्धीही केली. मुख्य म्हणजे रेडिओ कार्यक्रमांदरम्यान श्रोत्यांनीही खिलाडी कुमारला दाद दिल्याचे पाहायला मिळाले.
रेडिओ शोच्या माध्यमातून विविध विषयांवर चाहत्यांशी संवाद साधणाऱ्या अक्षयने एका श्रोत्याला अनपेक्षित प्रश्न विचारला. ‘तुम्ही कधी सॅनिटरी पॅड हातात घेतला आहे का, पत्नीसाठी कधी सॅनिटरी पॅड आणला आहे का?’, असा प्रश्न त्याने विचारला. खिलाडी कुमारशी बोलणाऱ्या त्या श्रोत्यानेही अगदी सहजपणे ‘हो मी पत्नीसाठी सॅनिटरी पॅड आणतो’, असे उत्तर दिले. त्याचे हे उत्तर ऐकून अक्षयला फारच आनंद झाला. आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी करत असताना अशा व्यक्तींशी संवाद साधण्याची आपल्याला संधी मिळत असल्यामुळे त्याने आपला आनंद व्यक्त केला.
आरवला मासिक पाळीविषयी सर्वकाही सांगितलेय- अक्षय कुमार
फक्त या रेडिओ शोवरच नव्हे तर, विविध कार्यक्रमांना हजेरी लावत अक्षय मालिस पाळी आणि त्यासंदर्भातील बऱ्याच विषयांवर खुलेपणाने संवाद साधतो आहे. खिलाडी कुमारचा हा अंदाज अनेकांनाच भावला असून, आता त्याने साकारलेला ‘पॅडमॅन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राधिका आपटे, अक्षय कुमार, सोनम कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आर.बाल्की यांनी केले असून, २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.