भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडू युवराज सिंग आणि ‘बॉडीगार्ड’ फेम अभिनेत्री हेजल किच गेल्याचवर्षी विवाहबंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाला अजून एक वर्ष पूर्णही झाले नाही तोवर हेजल गरोदर असल्याची चर्चा सध्या सुरु झालीये.
मुंबई विमानतळावरील हेजलचे फोटो काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर हेजलचे वाढलेले वजन पाहता ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र, युवराजच्या आईने हे वृत्त फेटाळून लावले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या की, युवराज आणि हेजलने अद्याप मुलाचा विचार केलेला नाही. हेजल गरोदर नाहीये. त्यांच्या लग्नाला आता कुठे दहा महिने पूर्ण झालेत. सध्या त्यांना वैवाहिक आयुष्याचा आनंद घेऊ दे. नंतर आयुष्यभर त्यांना मुलांचा सांभाळच करायचा आहे.
वाचा : ‘किडनी दिल्याबद्दल मी तिची ऋणी राहीन’; ‘या’ गायिकेने मानले मैत्रिणीचे आभार
शबनम सिंग ऐवढ्यावरच थांबल्या नाहीत. हेजल गरोदर असल्याची अफवा पसरवणाऱ्यांनाही त्यांनी फटकारले. सेलिब्रिटी असल्याचा अर्थ असा होत नाही की, त्यांना खासगी आयुष्यच नाही. हेजल जेव्हा खरंच गरोदर असेल, तेव्हा आमच्यासाठी तो आनंदाचा क्षण असेल. पण, अशा प्रकारच्या अफवा पसरवणे आणि एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बातम्या करणे हे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
वाचा : ‘सिमरन’चे दिग्दर्शक हंसल मेहता मूर्ख, नेभळट असल्याचे कंगनाचे मत?
हेजल गरोदर असल्याच्या अफवा पसरण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. एप्रिल महिन्यात एका मुलाखतीवेळी हेजलने केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत तिला बाळाची चाहूल लागल्याचे म्हटले गेले होते.