बॉलीवूडमध्ये एकेकाळी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणा-या अभिनेत्री रेखा यांच्या भांगातील कुंकू हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. बॉलीवूडची ही एव्हरग्रीन अभिनेत्री तिच्या भांगात अभिनेता संजय दत्तच्या नावाचे कुंकू भरत असल्याचे वृत्त रविवारपासून फिरत आहे.

रेखा या भांगात नक्की कोणाच्या नावाचे कुंकू भरतात हा आजवर अनेकांनाच पडत आलेला प्रश्न आहे. त्यात अशा प्रकारच्या चर्चा होणे म्हणजे नक्कीच धक्का देणारे आहे. या वृत्ताला दुजोरा देण्यासाठी अनेकांनी यासाठी यासिर उस्मान यांच्या रेखा- द अनटोल्ड स्टोरी या पुस्काचा संदर्भ दिला आहे. मात्र, यासिर उस्मान यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताचे खंडण केले आहे. ते म्हणाले की, हे वृत्त चुकीचे आहे. माझ्या पुस्तकात असे काहीच लिहलेले नाही. लोकांनी हे पुस्तक व्यवस्थित वाचलेले नाही. पुढे त्यांनी पुस्तकात लिहलेल्या घटनेसंदर्भात सांगितले. रेखा आणि संजय यांनी १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जमीन आसमान’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्याचवेळी या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. इतकेच नव्हे तर तेव्हा दोघांनी लग्न केल्याची देखील चर्चा होती. या अफवा इतक्या प्रमाणात पसरल्या की एका मासिकाच्या मुलाखतीतून संजयने सदर वृत्तांचे खंडण केले होते. त्याने अधिकृतरित्या सर्व अफवांना नाकारले होते, असे उस्मान म्हणाले.

यासिर उस्मान पुढे म्हणाले की, तेव्हा संजय आणि रेखा दोघेही अविवाहित होते. त्यात, संजय दत्तने हे वृत्त अधिकृतरित्या नाकारल्याने सदर प्रकरणाला आणखीनच हवा मिळाली होती. त्यावेळी ब-याच व्यक्तिंची नावे रेखा यांच्यासोबत जोडले गेल्याचे यासिर यांच्या पुस्तकात म्हटले आहे. यामध्ये शैलेंद्र सिंह, कमल हसन, निर्माता राजीव कुमार आणि संजय दत्त यांच्या नावांचा समावेश होता. दरम्यान, एक दिवस संजय दत्तच्या लग्नाचे वृत्त समोर आले. पण, हीसुद्धा अखेर एक अफवाच निघाली. आधीच्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी या वृत्ताचा तेव्हा आधार घेण्यात आला होता. ‘जमीन आसमान’ चित्रपटापासून या चर्चांना उधाण आले होते. त्यामुळेच संजय दत्तने स्वतः समोर येऊन या वृत्ताचे खंडण करण्याचा निर्णय घेतला होता.

सध्या दिग्दर्शक राज कुमार हिरानी हा संजय दत्तवर बायोपिक बनवत आहे. या चित्रपटात संजूबाबाची भूमिका अभिनेता रणबीर कपूर साकारत आहे. तर सुनील दत्त यांच्या भूमिकेत अभिनेता परेश रावल आणि नरगिस दत्त यांच्या भूमिकेत अभिनेत्री मनीषा कोइराला हे दिसतील. संजूबाबाची पत्नी मान्यता हिची भूमिका दिया मिर्झा साकारत आहे.