यावर्षी जूनमध्ये संगीतकार, गायक आणि अभिनेता हिमेश रेशमियाचा २२ वर्षांचा संसार मोडला. घटस्फोट घेत हिमेश आणि त्याची पत्नी कोमल विभक्त झाले. दोघांच्या वेगळे होण्यामागचं कारण टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूर असल्याची चर्चा तेव्हा होती. ‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार आता हिमेश आणि त्याची कथित प्रेयसी सोनिया लिव्ह-इनमध्ये राहत आहेत.

घटस्फोटापूर्वीही हिमेश सोनियासोबत राहत असल्याचं म्हटलं जात आहे. हिमेश आणि कोमल या दोघांना स्वयं नावाचा मुलगा आहे. सोनियाशी स्वयंची चांगली मैत्री जमली असून तो या दोघांना भेटायला जात असल्याचंही कळतंय. गाण्याचे रेकॉर्डिंग असो किंवा रिअॅलिटी शो, सोनियाला नेहमीच हिमेशसोबत पाहिलं गेलं. हिमेश आणि सोनिया सध्या अंधेरीतील लोखंडवालामधील फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहतात.

Sonia Kapoor
अभिनेत्री सोनिया कपूर

सर्वप्रथम २००६ मध्ये हिमेश आणि सोनियाचे अफेयर चर्चेत आले होते. पहिली चार वर्षे हिमेशने त्याच्या घरच्यांना तिची ओळख केवळ ‘चांगली मैत्रिण’ अशीच करुन दिली होती. पण, या दोघांची वाढती सलगी मीडियापासून लपून राहिली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमलला म्हणजेच हिमेशच्या पत्नीला याची पूर्ण कल्पना होती. असे असले तरी, तिने कधीच या सर्व प्रकाराला उघडपणे विरोध केला नाही.
कोमलशी घटस्फोटानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हिमेशने म्हटलं होतं की, ‘आम्ही घटस्फोट घेतला असला तरी आम्ही एकमेकांचा नितांत आदर करतो, तसेच एकमेकांच्या संमतीनेच आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही वेगळे झालो असलो तरी ती रेशमिया कुटुंबाची कायमच सदस्य राहील आणि मी कोमलच्या कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण भाग राहीन.’