नवीन चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील जणू एक सण वा उत्सव असायचा, अलिकडे हे प्रमाण कमी झालयं. अर्धाअधिक दिवस तो सगळाच प्रकार रंगे. या परंपरा व संस्कृतीला एखादा दिग्दर्शक अपवाद ठरु शके.
विशेषत: ते दिग्दर्शक गुलजार असतील तर… त्यांच्या ‘इजाजत’च्या (१९८८) मेहबूब स्टुडिओतील मुहूर्ताच्या वेळेस तसाच वेगळा अनुभव आला. गुलजार यांच्या दिग्दर्शनात रेखा व नसीरुद्दीन शाह अशी अगदीच वेगळी जोडी एकत्र येत होती हा त्या काळात तरी आश्चर्याचा धक्काच होता. मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘उमराव जान’ (१९८३) मधील अभिनयासाठी रेखाने अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावत टीकाकारांना गप्प केले. तर नसीरुद्दीन शाहने राजीव रॉय दिग्दर्शित ‘त्रिदेव’ (२९८८) मध्ये सोनमसोबत ‘तिरछी टोपीवाले…’, ‘ओये ओये…’ गाण्यावर धमाल नृत्य करीत समांतर चित्रपटाच्या समर्थकांचा रोष ओढवून घेतला होता. पण गुलजार दिग्दर्शित चित्रपटाच्या मुहूर्तावर अशा अन्य संदर्भाचा प्रभाव पडत नसतोच. कारण ते तद्दन फिल्मी नाहीत वा चित्रपटाच्या मुहूर्ताला ते शोबाजी मानत नाहीत. मुहूर्तापासूनच त्यांनी पहिले एकोणीस दिवसाचे चित्रीकरण सत्रही मेहबूब स्टुडिओतच आखले यावरून त्यांचे गांभीर्य लक्षात यावे. अभिनेता खासदार सुनील दत्त याच्या हस्ते मुहूर्त दृश्याचा क्लॅप होताच पडद्यावरील पती-पत्नी यांच्यातील अर्थात नसिर-रेखावरील एका तणावाचे दृश्य चित्रीत केले तेव्हाच चित्रपटाची साधारण कल्पना आली. गुलजार आपल्या दिग्दर्शनातील चित्रपटात फ्लॅशबॅकचा भरपूर परंतू प्रभावी वापर करतात हे ‘आँधी’, ‘मौसम’ अशा विविधतापूर्ण चित्रपटांच्या वेळेस अनुभवले होतेच. यावेळेस अनुराधा पटेलही हजर असल्याने थीमबाबत उत्सुकता वाढली. गुलजार कधीही आपल्या चित्रपटाच्या सेटवर मुलाखत देत नसत. (त्यासाठी पाली हिलवरील त्यांच्या बोस्कियाना बंगल्यावरील ऑफिसला फोन करून भेट निश्चित करावी लागे). त्यामुळेच ‘इजाजत’च्या मुहूर्ताच्या वेळच्या घटनांबद्दल जाणून घेणे आवश्यक ठरले. चित्रपट व दिग्दर्शक याची प्रकृती लक्षात घेऊन रेखाने आवर्जून साडीतच येणे स्वाभाविक वाटले. आणि मुहूर्तानंतर काही वेळातच तिने पहिल्या मजल्यावरील मेकअप रुमकडे जाणेही कौतुकाचेच. कारण हा फिल्मी सोहळा नाही याचे असणारे नेमके भान.
‘इजाजत’ पूर्ण होऊन पडद्यावर येण्यास काहीसा उशीरच झाला. पण त्यातील ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले व तेच गाणे या चित्रपटाची कायमस्वरुपी ओळख झाली. गीत लेखन अर्थातच गुलजार यांचे. त्याप्रमाणेच पार्श्वगायन आशा भोसले व संगीत राहुल देव बर्मन हेदेखील अर्थातच म्हणायचे काय?
दिलीप ठाकूर