हॉलिवूड निर्माता हार्वी विनस्टीनने अभिनेत्रींचे लैंगिक शोषण केल्याचा खुलासा झाला आणि सोशल मीडियावर या विषयीच्या बऱ्याच गोष्टी उघड झाल्या. #MeToo या हॅशटॅगअंतर्गत बऱ्याच नेटकऱ्यांनी आपल्यासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाचे प्रसंग सर्वांसमोर मांडले. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि टेलिव्हिजन कलाकारही मागे नाहीत. लैंगिक शोषणाच्या शिकार झालेल्या बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेले ‘ते’ प्रसंग मोठ्या धाडसाने सर्वांसमोर मांडले. यामध्ये आता आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे मुनमुन दत्ता. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे ती ‘बबिता’ या नावानेही ओळखली जाते.

मुनमुनने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरुन #MeToo या हॅशटॅगचा फोटो पोस्ट करत तिचे लैंगिक शोषण झाल्याचे स्पष्ट केले. ‘त्या’ आठवणींविषयी पुन्हा विचार करतानासुद्धा फार त्रास होतो, असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘अशा प्रकारची पोस्ट शेअर करत, या उपक्रमात सहभागी होत आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या प्रत्येक महिलेप्रती सहानुभूती दाखवत ही समस्या किती मोठी आहे, याचा सहज अंदाज लावता येतो’, असे मुनमुनने तिच्या पोस्टमध्ये लिहिले.

यासोबतच तिने पोस्टमध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाचा खुलासाही केला. याविषयी मुनमुनने लिहिले, ‘हे सर्व लिहिताना माझे डोळे भरुन आले आहेत. कारण, माझ्या मनात पुन्हा एकदा त्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी मी आमच्या शेजारी राहणाऱ्या एका काकांना खूप घाबरायचे. मी एकटी असायचे तेव्हा-तेव्हा ते मला पकडायचे आणि मी कोणाला याबाबत काही सांगू नये म्हणून धमकवायचे.’ या अनुभवासोबतच मुनमुनने तिच्या शिकवणीच्या शिक्षकांबद्दलही लिहिले. त्यांच्याकडूनही आपले शोषण घाल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले. शिकवणीमधील शिक्षक मुलींच्या अंतर्वस्त्रांना पकडायचे, त्यांना शरीराच्या खासगी जागांवर मारायचे’, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले. ज्या शिक्षकांना आपण राखी बांधली होती, त्यांनीच असे दुष्कृत्य केल्याचा तीव्र संताप मुनमुनने व्यक्त केला. त्यावेळी फारच लहान असल्यामुळे या सर्व गोष्टींची आपल्या भीती वाटायची आणि म्हणूनच याविषयी कोणाला आपण फार काही सांगूही शकलो नाही. अशा परिस्थितीत नेमके काय करावे हेच कळत नव्हते, असे म्हणत तिने काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या.

https://www.instagram.com/p/BaqLF2Qnlkz/

लहान वयात झालेल्या लैंगिक शोषणामुळे अनेकींच्या मनात संपूर्ण पुरुष वर्गाविषयीच द्वेषाची भावना निर्माण होते. ही एक अशी भावना आहे ज्यातून बाहेर येण्यासाठी बरीच वर्षे खर्ची घालावी लागतात, याकडेही तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे. #MeToo या हॅशटॅगमधून आपला अनुभव पोस्ट करत मुनमुनने आपल्याला स्वत:चा अभिमान वाटत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

https://www.instagram.com/p/Ba72L89n0Oa/