वडील आणि मुलगी हे एक असं नातं आहे ज्याविषयी सांगावं आणि लिहावं तितकं कमीच आहे. शब्दांत न मांडता येणाऱ्या या नात्यातील सुरेख बंधाचा प्रत्यय नुकताच आला असून, त्यामुळे प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता प्रकाशझोतात आला आहे. तो अभिनेता म्हणजे टॉम क्रूज. ‘मिशन इम्पॉसिबल’ चित्रपट मालिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने त्याच्या मुलीसाठी एक मह्त्त्वाचा निर्णय घेतला आहे.

टॉमने त्याच्या १२ वर्षांच्या मुलीसाठी धार्मिक समजुतींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. टॉम ‘साइंटोलॉजी’ Scientology या धर्मिक समजुतींचा अनुयायी आहे. या धर्मात सांगितलेल्या सर्व गोष्टींचे पालन करणाऱ्या टॉमला त्याच्या मुलीसोबत योग्य तितका वेळ व्यतीत करण्याची संधी मिळत नव्हती. त्यामुळेच त्याने फक्त मुलीसाठी या धर्म प्रथांपासून दूर राण्याचा निर्णय घेतला, असे वृत्त ‘हॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे.

२०१२ मध्ये टॉम क्रूज आणि अभिनेत्री कॅटी होम्स यांच्या नात्यात दुरावा आला होता. तेव्हापासूनच त्याची मुलगी तिच्या आईसोबत म्हणजेच कॅटीसोबत राहत आहे. पण, आता मात्र आपल्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठीच टॉमने हे पाऊल उचलल्याचे कळतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या मुलीसाठी म्हणजेच सूरीसाठी म्हणून टॉम पुन्हा एकदा ख्रिस्त धर्माकडे वळू शकतो.

गेल्या पाच वर्षांपासून आपल्या मुलीला भेटणे शक्य होत नसल्यामुळेच अखेर तो या निर्णयावर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका वृत्तानुसार वडिलांची भूमिका निभावण्यात टॉम अपयशी ठरल्यामुळेच कॅटीने कोणताच पर्याय न सुचल्यामुळे त्याच्यासोबतचे सर्व संबंध तोडले. धर्म, त्यात देण्यात आलेले उपदेश याच गोष्टींमध्ये गुंतून गेल्यामुळे एक वडील म्हणून मात्र टॉम अपयशी ठरला आणि तो तिला पुरेसा वेळही देऊ शकत नव्हता. किंबहुना ती आता त्याच्याशिवाय जगायला शिकली आहे, असे कॅटीने म्हटल्याच्याही चर्चा होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.