बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने काल त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही त्याची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांनी त्याच्या घरी ‘मन्नत’वर गर्दी केली होती. शाहरुखने मुलगा अब्रामसोबत गच्चीत येऊन सगळ्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. पण वाढदिवस झाल्यानंतर शाहरुखच्या घराबाहेर काहीसे वेगळे दृश्य दिसले.

‘मन्नत’बाहेर चप्पलांचा ढिग पडलेला होता. शाहरुख गच्चीत येताच त्याच्या चाहत्यांनी एवढी गर्दी केली की ते एकमेकांना ढकलू लागले. शाहरुखने आपल्याला पाहावे या प्रयत्नात त्याचे चाहते होते. त्यामुळे कोणाची चप्पल तुटली होती तर कोणाचे मोबाईल गहाळ झाले होते.

गेल्या कित्येक वर्षांपासून शाहरुखच्या वाढदिवसाला रात्रीपासूनच हजारोंच्या संख्येने चाहते तासन् तास वाट पाहात उभे असतात. या सगळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरांनी मोबाईल फोन आणि पर्स लंपास केल्याच्या तक्रारी वांद्रे पोलीस ठाण्यात अनेकांनी केल्याचे वृत्त आहे.

एकीकडे वांद्रे पोलिसांचा तपास सुरु असल्याचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे  पोलीस आपली तक्रारच दाखल करून घेत नसल्याचे मोबाइल चोरीला गेलेल्या लोकांनी सांगितले.

वाढदिवसाच्या एक दिवस आधीच त्याच्या बर्थडेचे ग्रॅण्ड सेलिब्रेशन अलिबागमध्ये करण्यात आले. या पार्टीला सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होत्या. जेव्हा शाहरुख आपल्या मित्र-परिवारांसोबत काही निवांत क्षणांचा अनुभव घेत होता, तेव्हा त्याच्या घरासमोर काहीसे असे दृश्य होते.

Story img Loader