बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं कपल म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ. गेल्या महिन्यातच विकी आणि कतरिनाने गुपचूप साखरपुडा केल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. यानंतर सोशल मीडियावरून त्यांना अनेकांनी शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली होती. अखेर विकीच्या टीमकडून विकी आणि कतरिनाचा साखरपुडा झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आणि चर्चांना पूर्णविराम लागला.
विकी कौशल आणि कतरीनाच्या साखरपुड्याच्या चर्चा रंगत असताना विकीच्या घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती याचा खुलासा नुकताच विकीच्या भावाने केला आहे. विकीच्या साखरपुड्याची बातमी ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच हसू आवरण कठीण झाल्याचं सनी म्हणाला. विकीचे आई-वडील त्याला “साखरपुड्याची मिठाई दिली नाहीस तू” असं मजेत म्हणायचे असा खुलासा सनीने केला.
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सनी म्हणाला, ” मला आठवतंय विकी सकाळी जीममध्ये गेला होता. तेव्हा या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे जेव्हा तो घरी परतला तेव्हा आई- वडील त्याला मजेत म्हणाले, अरे यार तुझा साखरपुडा झाला, मिठाई तर दे.” असं म्हणत विकीच्या घरच्यांनी त्याची फिरकी घेतल्याचं सनीने सांगितलं. यावर विकीचं उत्तर काय होतं हे देखील सनीने सांगितलं, “जितका खरा हा साखरपुडा झालाय आहे तितकीच खरी मिठाई पण खा” असं मजेशीर उत्तर विकीने दिल्याचं सनी म्हणाला. शिवाय या बातम्यांची आम्ही मजा घेतली असं त्याने सांगितलं.
View this post on Instagram
गेल्या दोन वर्षांपासून विकी आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. अद्याप दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीरपणे खुलासा केलेला नाही. असं असलं तरी अनेक इव्हेंट तसचं बॉलिवूड पार्ट्यांमध्ये विकी आणि कतरिनाला एकत्र स्पॉट करण्यात आलंय.
यावर्षाच्या सुरुवातीला देखील हर्षवर्धन कपूरने विकी आणि कतरिनाच्या अफेअरवर शिक्कामोर्तब केलं होतं. बॉलिवूडमधील कोणत्या कपलच्या अफेरच्या अफवा या खऱ्या आहेत? असा प्रश्न एका मुलाखतीत हर्षवर्धनला विचारण्यात आला होता. यावर हर्षवर्धनने विकी आणि कतरिनाचं नाव घेतलं होतं. ” विकी आणि कतरिना एकत्र आहेत. हे खरं आहे… हे बोलल्यानंतर आता मी कदाचित अडचणीत सापडू शकतो.” असं हर्षवर्धन म्हणाला होता.