भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी शुक्रवारीच ‘हम हिंदुस्तानी’ हे गाणं रिलीज करण्यात आलंय. ‘धमाका रेकॉर्ड्स’च्या या गाण्याने स्वातंत्र्यदिनासाठीचा तरुणाईचा उत्साह आणि प्रचंड देशाभिमानाची भावना दुपटीने वाढवलीय. देशाच्या ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह बॉलिवूडमधील तब्बल १३ दिग्गजांनी आपल्या सुरेल सुमधूर चाल आणि त्याला साजेसं दृश्य, कलाकारांचा अभिनय या बळावर थेट मनाला भिडणाऱ्या भारताचं दर्शन घडवलंय. यात पद्मिनी कोल्हापुरे, अनिल अग्रवाल, सोनू निगम, कैलाश खेर, अलका याग्निक, शब्बीर कुमार, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, श्रुति हसन, तारा सुतारिया, अंकित तिवारी, सिद्धांत कपूर आणि जन्नत जुबैर यांनी या गाण्याला आपला सुरेल आवाज दिलाय.

बॉलिवूडमधील सर्व दिग्गजांनी पहिल्यांदाच एकत्र येत यंदाचा स्वातंत्र्यदिन आणखी स्पेशल बनवलाय. सध्या आपला भारत देश करोना महामारीमुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करतोय. या कठिण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महामारीदरम्यान काम करणाऱ्या योद्दांना सन्मानित करण्यासाठी ‘धमाका रेकॉर्ड्स’ने हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलंय. या गाण्यात बॉलिवूडधील १५ दिग्गज आपल्या आवाजाच्या माध्यमातून सध्याच्या कठिण काळात करोनाविरोधातील लढाईत सर्व भारतीयांमध्ये एकजुटीची भावना निर्माण करताना दिसून आले.

देशात करोना विषाणूचा कहर अद्याप शमलेला नाही. अशात यंदाच्या स्वातंत्र्य दिनी लोकांमध्ये देशभक्तीप्रमाणेच नव्या आशेचा किरण देणं गरजेचं आहे. म्हणून ‘धमाका रेकॉर्ड्स’ने बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना एकत्र करत हे गाण सादर केलंय. वेदांता ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशनने या गाण्यासाठी सहकार्य केलं आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शक दिलशाद शब्बीर शेख तर गीतकार-संगीतकार कशीश कुमार आणि मोहित बिटलब यांनी केलंय.

 

यूट्यूबवर रिलीज होताच गाण्याला ८ लाख व्ह्यूज

प्रियांका शर्मा आणि पारस मेहता यांच्या ‘धमाका रेकॉर्ड्स’च्या लेबल अंतर्गत तयार करण्यात आलेलं हे गाणं युट्यूबवर रिलीज करण्यात आलंय. हे गाणं रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. एका दिवसात या गाण्याने तब्बल ८ लाख व्ह्यूजचा टप्पा पार केलाय. हे गाणं पाहिल्यानंतर करोना महामारीमुळे निराश झालेल्या प्रेक्षकांमध्ये यंदाच्या स्वातंत्र्यदिनी नवी आशा मिळाल्याची भावना निर्माण झालीय. करोनासारख्या कठिण काळातून लवकरच बाहेर पडू आणि पुन्हा पहिल्यासारखं जगात वावरू शकतो, अशा विश्वासंच त्यांना या गाण्यातून मिळालाय.