दिवसेंदिवस मराठी चित्रपटातील बदलते विषय आणि प्रसिद्धी लक्षात घेता, बॉलिवूडकरांच्या नजरा मराठी सिनेसृष्टीकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून मराठी चित्रपटांची वाटचाल पाहता अनेक हिंदी कलाकारांनी मराठी चित्रपटांमध्ये नशीब आजमावले आहे. विशेष म्हणजे, रसिकांनी देखील त्याला लगेच आपलेसे केले आहे. त्यामुळे विविध धाटणीच्या मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठीसुद्धा आता मातब्बर हिंदी कलाकर प्राधान्य देत आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीत अर्थात बॉलिवूडमध्ये विशेष नाव आणि प्रसिद्धी मिळून देखील, मराठीत पदार्पण करणाऱ्या हिंदी कलाकरांच्या यादीत आणखी एका कलाकाराच्या नावाचा समावेश झाला आहे. हा अभिनेता म्हणजे गुलशन देवय्या. ‘राम-लीला’, ‘शैतान’, ‘हंटर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा, आणि चौकटीबाहेरच्या भूमिका साकारणारा हा अभिनेता लवकरच ‘डाव’ या मराठी चित्रपटातून झळकणार आहे.
मूळच्या बंगळुरूचा असणाऱ्या गुलशनने या चित्रपटासाठी महिनाभर मराठी भाषेचे धडे गिरवून घेतले असल्याचे समजते. याबद्दल सांगताना गुलशनने म्हणाला की, ‘यापूर्वी ‘हंटर’ या चित्रपटात मी मराठीमध्ये काही एक-दोन वाक्य बोललो असेन. पण, त्यामुळे अस्खलित मराठी बोलता येते असे नव्हे. मात्र, आगामी ‘डाव’ या मराठी चित्रपटासाठी मला अस्खलित मराठी बोलता येणे गरजेचे होते, शिवाय या चित्रपटाची कथाही मला खूप आवडली होती. त्यामुळे, फक्त भाषेच्या प्रश्मामुळे चित्रपट नाकारण्याची चूक मी केली नाही. म्हणूनच महिनाभर मराठीचे प्रशिक्षण घेणे मला योग्य वाटले. अर्थात, मुंबईतील मराठमोळ्या वातावरणात मी राहिलो असल्यामुळे, ही भाषा आत्मसात करण्यास मला जास्त वेळ लागला नाही. त्यामुळे आता मी चांगल्याप्रकारे मराठी बोलू शकतो’.
दरम्यान, आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या ‘ऑडबॉल मोशन पिक्चर्स’ प्रस्तुत ‘डाव’ या चित्रपटाची निर्मिती केली असून, कनिश्क वर्मा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये हा चित्रपट चित्रित झाला असल्यामुळे, सध्या तो कुतूहलाचा विषय ठरत आहे. टोनी डिसुजा, नितीन उपाध्याय आणि अमूल मोहन या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यामुळे आता हिंदीत विशेष कामगिरी बजावणारा गुलशन मराठीत काय ‘डाव’ साधतो हे लवकरच कळेल.