काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यावेळी मुंबईकर अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आवाज उठवत होते. अशावेळी अभिनेता नाना पाटेकर यांनी मात्र फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आळवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांविषयी त्यांची भूमिका मांडल्यानंतर राज ठाकरे यांनी ज्या विषयांची माहिती नाही, त्यात उगाच चोंबडेपणा करू नये. ते उत्तम अभिनेते आहेत, पण रस्त्यावर काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दांत त्यांच्यावर टीका केली होती. तसेच, राज यांनी नानांची नक्कलही केली होती.
या दोघांच्या वादात मात्र अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसते. राज आणि नाना यांच्यात सुरू असलेल्या वादाबद्दल त्यांना विचारले असता, त्या दोघांवर प्रतिक्रिया देऊन मी अजून चोंबडेपणा का करु असेच काहीसे उत्तर मकरंद अनासपुरे यांनी दिले.
राज ठाकरे यांनी नाना यांच्यावर टीका केल्यानंतर पाटेकर यांनीही ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझे मत मांडले. राज ठाकरे यांचे वैयक्तिक काही नुकसान झाले नाही. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक मत कमी झाल्याचे सांगत नानांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता.