‘दंगल’ या गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडला आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करणारा चित्रपट मिळाला. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात झायरा वसिम, फातिमा सना शेख, सानिया मल्होत्रा, सुहानी भटनागर या नवअभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. चित्रपटाला प्रदर्शित होऊन दहा महिने लोटले असले, तरी आजही ‘दंगल’विषयी आणि त्यातील कलाकारांविषयी बरीच चर्चा केली जाते. लवकरच झायरा आपल्याला ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. आमिरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात तो स्वतः पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारतोय.

वाचा : ब्लू व्हेलचा सामना करण्यासाठी येतोय ‘कासव’

बॉलिवूड पदार्पणातच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या झायराने ती कधीच ग्लॅमरस भूमिका करणार नसल्याचा खुलासा केला. याबद्दल ती म्हणाली की, मला गंभीर भूमिका मिळाल्या तर त्या मी सहज निभावू शकेन. पण, मला बोल्ड भूमिका करण्यास सांगितल्यास मला ते बहुतेक शक्य होणार नाही.

मी कधीच ग्लॅमरस भूमिका करू शकत नाही. खरंतर अशा भूमिका साकारताना मला अवघडल्यासारखे वाटेल. मी एका वेगळ्या वातावरणात मोठी झालीये. माझ्यासाठी अभिनयाचा अर्थ फेम आणि ग्लॅमर असा होत नाही. अभिनय हा माझ्या जीवाभावाचा विषय असून त्यावर मी कधीच डाग लागू देणार नाही, असे झायरा एका मुलाखतीवेळी म्हणाली.

वाचा : PHOTO नजरेत सूडाग्नी असणारा ‘अलाउद्दीन खिल्जी’

गायक होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका मुलीवर ‘सिक्रेट सुपरस्टार’ची कथा आधारित आहे. येत्या १९ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.