बॉलिवूडमध्येही लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात मात्र उघडपणे कोणीच त्याची वाच्यता करत नाही, असं वक्तव्य अभिनेत्री तापसी पन्नूने केलं आहे. मी टू (#MeToo) मोहिमेनंतर हॉलिवूडमध्ये बऱ्याच अभिनेत्रींनी पुढे येत लैंगिक अत्याचाराविरोधी आवाज उठवला मात्र, बॉलिवूडमध्ये अजूनही यावर मोकळेपणाने, कोणत्याही भितीशिवाय बोललं जात नाही असं मत तिने मांडलं.
‘सुदैवाने मला अशा कोणत्याच प्रसंगाचा सामना करावा लागला नाही. पण तसं झालं असतं तर मी नक्कीच आवाज उठवला असता. बॉलिवूडमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात पण बऱ्याच गोष्टींच्या भीतीने त्यावर उघडपणे बोललं जात नाही. बदनामीच्या भीतीने किंवा करिअरला मिळालेली थोडीफार गतीसुद्धा मंदावेल आणि भविष्यात कोणी समोर उभं करणार नाही यामुळे अनेकजण मौन बाळगणं पसंत करतात,’ असं तापसी म्हणाली. बॉलिवूडमध्ये शोषण आणि अत्याचाराविरोधात उघडपणे बोलणाऱ्यांना पाठिंबा मिळत नसल्याची तक्रारसुद्धा तिनं यावेळी केली.
वाचा : ‘क्वांटिको’ तर राष्ट्राविरोधी; प्रियांका नेटकऱ्यांच्या रडारवर
‘पिंक’, ‘नाम शबाना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तापसीने मुख्य भूमिका साकारली आहे. विशेषकरून ‘पिंक’ या चित्रपटामुळे तापसीला बॉलिवूडमध्ये विशेष ओळख मिळाली. त्यापूर्वी तिने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.