देशभरात सध्या #MeToo चं वादळ घोंघावत आहे आणि त्याचे परिणामसुद्धा दिसू लागले आहेत. या मोहिमेत मोठमोठी नावं समोर आली आणि त्यांच्याबद्दल धक्कादायक खुलासे झाले. त्यातीलच एक नाव म्हणजे दिग्दर्शक साजिद खान. महिला पत्रकार, सहाय्यक दिग्दर्शक आणि दोन अभिनेत्रींनी साजिदवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. इतकंच नव्हे तर दिया मिर्झा आणि बिपाशा बासू यांसारख्या अभिनेत्रींनीही महिलांप्रती त्याची वागणूक किती वाईट आहे हे सांगितलं. अशातच साजिदचा एक जुना व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. आपण महिलांशी किती वाईटप्रकारे वागायचो, हे साजिद स्वत: या मुलाखतीत सांगत आहे.

”विशीत असताना मी मुलींना, महिलांना अत्यंत वाईट वागणूक दिली. त्यावेळी माझे बरेच अफेअर्स होते. बडा कमीना आदमी था,” असं साजिद ‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला. ”मी अनेक मुलींचा हृदयभंग केला आहे. मुलींशी खोटं बोललो, त्यांना फसवलं आणि मला या गोष्टींचा त्यावेळी फार काही फरक पडत नव्हता,” असं तो पुढे म्हणाला.

#MeToo : आलोक नाथ यांना मुंबई कोर्टाने फटकारले

त्यावेळी साजिद खान छोट्या पडद्यावर काम करत होता आणि करिअरची गाडीसुद्धा रुळावर होती. त्यानंतर तिशीत चित्रपट दिग्दर्शनावर अधिक लक्ष केंद्रीत केल्याचं त्याने सांगितलं. ”चित्रपट दिग्दर्शनात मग्न झाल्यावर मी फारशा मुलींकडे आकर्षित झालो नाही. तेवढा वेळच मला मिळाला नाही. कारण फार मोठी जबाबदारी तुमच्यावर असते आणि माझ्या या मताशी कदाचित इतर दिग्दर्शकसुद्धा सहमत असतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्री दिया मिर्झानं साजिदचं महिलांप्रती असलेलं वर्तन हे नेहमीच घृणास्पद असतं, असं म्हणत साजिदवर आरोप केलेल्या पीडितांना पाठिंबा दर्शवला होता. साजिदवरील आरोपांमुळे ‘हाऊसफुल ४’ मधील अभिनेता अक्षय कुमारनं साजिदसोबत काम न करण्याचं ठरवलं आहे. तर दुसरीकडे साजिद खानची बहिण फराह खान हिनं देखील साजिदवर टीका करत या प्रकरणात त्याची साथ न देण्याचं ठरवलं आहे.