काही चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करू शकत नाहीत पण प्रेक्षक-समीक्षकांवर विशेष छाप सोडून जातात. २००४ मध्ये शाहरुख खानचा असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आजही अनेकांना चांगलाच लक्षात असेल. मात्र, हा बहुचर्चित चित्रपट पाहिलाच नसल्याचं वक्तव्य आमिर खानने केलं आहे.

पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यातील २४ जिल्ह्यांत यंदा श्रमदान करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. पानी फाऊंडेशन स्थापन करण्याची प्रेरणा शाहरुखच्या ‘स्वदेस’ या चित्रपटातून मिळाली का, असा प्रश्न त्याला यावेळी विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत तो म्हणाला की, ‘मी स्वदेस पाहिला नाही. फक्त त्याच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमात त्याला शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो.’

वाचा : सुनील ग्रोवरला जॅकपॉट; सलमानसोबत चित्रपटात करणार काम

गेल्या वर्षी पानी फाऊंडेशनच्या वतीने पुण्यात बालेवाडी इथं बक्षीस वितरण करण्यात आलं होतं. स्वाइन फ्लू झाल्याने आमिर त्यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नव्हता. तेव्हा आमिरने शाहरुखला कार्यक्रमास जाण्याची विनंती केली होती आणि आमिरसाठी त्याने कार्यक्रमाला हजेरीसुद्धा लावली होती.