बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आगामी ‘पॅडमॅन’ चित्रपटच्या प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

‘पॅडमॅन’च्या प्रसिद्धीमध्ये अक्षय कोणतीच कसर कमी पडू देत नाही आहे. नुकताच त्याने मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने सॅनिटरी नॅपकिन्स आणि जीएसटीविषयी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. ‘सॅनिटरी नॅपकिन्सवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्यात आल्याने महिलांना मासिक पाळीमध्ये मूलभूत असलेली वस्तू घेणेच परवडणारे नाही. त्यामुळे महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स सहज उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ही महिलांची मूलभूत गरज आहे. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेसाठी ते गरजेचे असून, ही काही चैनीची वस्तू नाही’, असे अक्षय म्हणाला.

वाचा : ..तेव्हा जेनेलिया रितेशशी बोलत नव्हती

अक्षय केवळ एवढ्यावरच थांबला नाही. मासिक पाळी आलेल्या स्त्रीला त्या दिवसांदरम्यान अनेक घरांमध्ये वेगळी वागणूक दिली जाते. अशी मानसिकता असलेल्या व्यक्तींना फटकारत तो म्हणाला की, ‘त्या जणू बाहेरची व्यक्ती असल्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली जाते. इतकेच नव्हे त्यादरम्यान स्त्रियांना व्हरांड्यात झोपण्यासही सांगतात, हे किती चुकीचे आहे. भारतातील जवळपास ८२ टक्के महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स सहज उपलब्ध होत नाहीत हे सांगण्याचीच मला लाज वाटते.’

मुलगी जेव्हा तारुण्यात येते तेव्हा आनंद साजरा करायला हवा. कारण, त्यावेळी तिच्यासोबत काहीतरी चांगले घडत असते या मुद्द्यावरही अक्षयने जोर दिला. तो म्हणाला की, मुलगी तारुण्यात येत असताना तिच्यात अनेक शारीरिक बदल होत असतात. त्यावेळी तिच्यासोबत काहीतरी चांगले घडत आहे याची जाणीव होईल तेव्हाच तिच्यामध्ये विश्वास निर्माण होऊन ती स्वतःला सुरक्षित समजेल. मासिक पाळीबद्दलची कोणतीही गोष्ट लपवण्याची भारतीयांची मानसिकताच मला कळत नाही.

वाचा : २४ वर्षांनंतर एकत्र येणार सनी देओल- डिंपल कपाडिया

महिला प्रधान आणि सामाजिक संदेश देणारे चित्रपट करण्यावर अक्षय सध्या भर देत आहे. मासिक पाळी आणि त्या काळातील स्वच्छता याविषयी महिलांनी उघडपणे बोलावे यासाठी ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ फेम अक्षयने उचललेले हे पाऊल नक्कीच प्रशंसात्मक आहे.

Story img Loader