दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटातील शिवगामीची भूमिका नाकारल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवीला अनेक प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांनी अद्यापही तिचा पाठलाग सोडला नाही असंच म्हणावं लागेल. कारण आगामी ‘मॉम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होत असलेल्या मुलाखतींमध्येही श्रीदेवीला हाच प्रश्न पुन्हा विचारला गेला. अखेर श्रीदेवीनेही मौन सोडलं आणि त्याचं उत्तर प्रसारमाध्यमांना दिलं.

एका तेलुगू वाहिनीला मुलाखत देत असताना श्रीदेवी म्हणाली की, ‘विविध कारणांसाठी माझ्या करिअरमध्ये मी अनेक चित्रपटांचा भाग होऊ शकली नाही. मात्र याच चित्रपटाविषयी सारखे का बोलले जात आहे हेच मला समजत नाहीये. बाहुबली चित्रपटाचे दोन्ही भाग प्रदर्शित झाले आणि यशस्वी ठरले. मग अजूनही या चित्रपटांबाबत का विचारले जातेय. याबाबत बोलणे मी अनेक दिवसांपासून टाळले. मात्र आता मला स्पष्ट करायचे आहे.’

शिवगामीच्या भूमिकेसाठी श्रीदेवीने १० कोटी रुपये मानधन, हॉटेलमधील संपूर्ण एक मजला आणि १० विमानाची तिकिटे मागितल्याची चर्चा होती. तिच्याबाबत होणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना ती पुढे म्हणाली, ‘जवळपास ५० वर्षांपासून मी सिनेसृष्टीत काम करतेय आणि तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये मी भूमिका साकारली आहे. अशा निरर्थक गोष्टींची मागणी करत मी माझं करिअर घडवलंय असं तुम्हाला वाटतं का? मी जर असे असते तर लोकांनी मला कधीच या सिनेसृष्टीतून बाहेर काढलं असतं. निर्मात्याने राजामौली यांना या मागण्यांबद्दल खोटं सांगितलं असेल तर मला माहित नाही किंवा काही गैरसमज त्यांना झाला असेल. या सर्व गोष्टींनी मला काही फरक पडला नाही मात्र जेव्हा मी राजामौली यांची मुलाखत ऐकली तेव्हा मी फार दु:खी झाले. ते खूप शांत आहेत असं मी ऐकलं होतं. त्यांचे चित्रपट मी पाहिले आणि त्यांच्यासोबत काम करायला मला आवडलं असतं. मात्र या प्रकरणाबद्दल ते ज्याप्रकारे माध्यमांसमोर बोललं जातंय, त्याचं मला खूप वाईट वाटतं.’

वाचा : लाडक्या भावाला सोनमकडून ‘स्पेशल गिफ्ट’

एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ सिनेमातील शिवगामीची भूमिका सुरूवातीला बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीला ऑफर करण्यात आली होती. पण श्रीदेवीने अवाच्चा सव्वा मानधन मागितल्याची चर्चा होती. त्यामुळे राजामौली यांनी शिवगामीच्या भूमिकेसाठी रम्या कृष्णनला घेतल्याचे म्हटले जात होते. मात्र श्रीदेवीच्या या उत्तराने अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.